पोलिसांनी मजुराचे कपडे घालून अट्टल घरफोड्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:58+5:302021-07-18T04:27:58+5:30

सातारा : गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून घरफोडीचे तब्बल १० गुन्हे ...

The police caught the burglar dressed as a laborer | पोलिसांनी मजुराचे कपडे घालून अट्टल घरफोड्यास पकडले

पोलिसांनी मजुराचे कपडे घालून अट्टल घरफोड्यास पकडले

Next

सातारा : गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून घरफोडीचे तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी मजुराचे कपडे घालून त्याला उसाच्या शेतातून अटक केली असल्याचे समोर आले आहे.

जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे (रा.सुरूर, ता.वाई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाई, जावळी, कोरेगाव, खंडाळा, सातारा या तालुक्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घरफोडी, चोऱ्या होत होत्या. या चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर वाई तालुक्यामध्ये जक्कल काळे हा असल्याचे समोर आले. त्यानंतर, एलसीबीचे पथक तेथे रवाना झाले. पोलिसांनी मजुराचा वेश परिधान करून दोन दिवस उसाच्या शेतात गस्त घातली. त्यावेळी जक्कल काळे हा उसाच्या शेतात लपलेला पोलिसांना दिसून आला. त्यानंतर, त्याला पोलिसांनी पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडून घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, उत्तम दबडे, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, संतोष पवार, प्रवीण फडतरे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण पवार आदींनी या भाग घेतला.

चाैकट : या ठिकाणी चोरी...

जक्कल काळे याची चोरीची यादी फार मोठी आहे. त्याने वाठार, भुईज, खंडाळा, कोरेगाव, लोणंद, मेझा, सातारा तालुका आदी परिसरात घरफोडी चोऱ्या केल्या आहेत. जवळपास संपूर्ण जिल्ह्यात त्याने चोरी केली आहे. यातील प्रत्येक गुन्ह्यात त्याला विविध पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

जक्कल काळेवर यापूर्वी खुनाचे २, जबरी चोरीचे २, घरफोडीचे ९, चोरीचे २, पोलिसांच्या ताब्यात पळून जाणे १ असे तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत.

Web Title: The police caught the burglar dressed as a laborer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.