पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज
By admin | Published: January 2, 2017 11:11 PM2017-01-02T23:11:30+5:302017-01-02T23:11:30+5:30
युवक खून प्रकरण : कऱ्हाडात तपास गतीने; अप्पर पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
कऱ्हाड : येथील गजानन हौसिंग सोसायटीत रविवारी झालेल्या खून प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. पोलिस पथकाने सोमवारी घटनास्थळी भेट देऊन नातेवाइकांकडून माहिती घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक परजिल्ह्यात गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कऱ्हाडनजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत रविवारी विजय रामचंद्र पवार या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. विजय पवार हा वीज कंपनीत सहायक लेखा व्यवस्थापक पदावर सांगली-विश्रामबागमध्ये कार्यरत होता. रविवारी सुटी असल्याने तो घरीच थांबला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र घरी आला. त्यावेळी विजयने त्याची कार मित्राकडे धुण्यासाठी दिली. मित्र संबंधित कार घेऊन कऱ्हाडातील सर्व्हिसिंग सेेंटरवर गेला. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास भाची चैताली हिने विजयला जेवण दिले. त्यानंतर ती क्लासला निघून गेली. एक वाजण्याच्या सुमारास मित्राने विजयला फोन केला. सर्व्हिसिंग सेंटरवर गर्दी असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी ‘कार न धुता ती घेऊन घरी ये,’ असे विजय त्याला म्हणाला. सुमारे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास तो मित्र कार घेऊन घरी गेला. तो घरामध्ये गेला असता विजय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. हल्लेखोरांनी विजयच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचे समोर आले. तसेच खून करून कोयता, मंकी कॅप व जर्किन हल्लेखोराने घराच्या पत्र्यावर टाकले होते. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन जप्त केले.
या खून प्रकरणाचा रविवारपासून गतीने तपास सुरू आहे. रविवारी पोलिसांनी नातेवाइकांकडून माहिती घेतली. मात्र, त्यातून कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचता आले नाही. तसेच हल्लेखोराविषयीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. सोमवारी पोलिसांनी गणेश मंदिर तसेच परिसरातील काही खासगी ठिकाणी लावलेले सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. नातेवाईक व मित्रांकडूनही माहिती घेण्यात आली. (प्रतिनिधी)