पोलिसांनो, कर्कश पोंगाणे जप्त करा!

By Admin | Published: September 7, 2014 10:26 PM2014-09-07T22:26:34+5:302014-09-07T23:21:51+5:30

महिलावर्ग त्रस्त : हुल्लडबाजांना ऐन उत्सवात तरुणींची छेड काढण्यास मिळाले नवे साधन

Police, confiscate hoarse ponga! | पोलिसांनो, कर्कश पोंगाणे जप्त करा!

पोलिसांनो, कर्कश पोंगाणे जप्त करा!

googlenewsNext

सातारा : गणेशोत्सवात डॉल्बीच्या दणदणाटाबद्दल उलटसुलट चर्चा, मत-मतांतरे सुरू असतानाच सातारकरांच्या कानावर वितभर पोंगाण्याचे आक्रमण झाले आहे. हे पोंगाणे अचानक कानाजवळ वाजल्यास अक्षरश: दचकायला होत असून, अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना डॉल्बीबरोबरच या पोंगाण्यापासून कानांचे रक्षण करावे लागणार आहे.
गणेशोत्सवात रात्री उशिरा देखावे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात. विशेषत: गौरी विसर्जनानंतर रस्त्यांवरील गर्दी वाढते. अनेक फेरीवाले या गर्दीचा लाभ घेऊन व्यवसाय करतात. खाद्यपदार्थांबरोबरच खेळणी आणि पोंगाणे विकणारे फेरीवाले हे गणेशोत्सवातील खास वैशिष्ट्य आहे. पोंगाण्यांच्या आवाजाने गणेशोत्सवाच्या रात्री भारून जातात. सामान्यत: आठ इंच आकाराचे, कमी आवाज करणारे आणि फुंकर मारताच कागदी गुंडाळी उलगडणारे पोंगाणे विक्रीस येतात.
परंतु यावर्षी विक्रीसाठी आलेले पोंगाणे आकाराने छोटे; पण अत्यंत कर्कश आवाज करणारे आहेत. सुमारे चार इंच लांबीचे हे पोंगाणे लाल रंगाचे असून, ट्रम्पेटसारख्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलांऐवजी हुल्लडबाज तरुणांनाच ते अधिक आकर्षित करीत आहेत. गणपती पाहायला बाहेर पडलेल्या युवतींना या पोंगाण्यांचा प्रचंड त्रास होत आहे. युवती दिसल्यास हुल्लडबाज युवक मुद्दाम पोंगाणा कर्कश आवाजात वाजवत आहेत. सोमवारी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यावेळी तरी पोलिसांनी विक्रेत्यांकडूनच पोंगाणे जप्त करावेत, अशी मागणी महिलावर्गाकडून होत आहे. काही महिलांनी ‘लोकमत’ कार्यालयात रविवारी दूरध्वनी केले आणि या हुल्लडबाजांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार केली. ‘पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विसर्जन मिरवणुकीवेळी शहरात एकही पोंगाणा विक्रेता दिसणार नाही अशी व्यवस्था करावी; जेणेकरून महिलांना विसर्जन मिरवणुकीचा यथेच्छ आनंद घेता येईल,’ असे मत महिलांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

कर्कश पोंगाणा मुद्दाम लहान मुलांच्या जवळ वाजवून त्रास देणाऱ्या युवकाला पोलिसांची ‘थप्पड की गूँज’ ऐकावी लागली.
हा प्रकार राजवाडा परिसरात गोल बागेजवळ शनिवारी रात्री उशिरा घडला. हुल्लडबाजांची अनेक टोळकी गणपती पाहायला येणाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी या पोंगाण्याचा वापर करीत होते.
त्यातील एकाने लहान मुलांच्या कानाजवळ पोंगाणा वाजवला, त्याबरोबर जवळच उभ्या असलेल्या दोन पोलिसांनी त्याच्या कानाखाली वाजवली. त्याच्या हातातला पोंगाणा हिसकावून पोलिसांनी त्याला यथेच्छ चोप दिला.

Web Title: Police, confiscate hoarse ponga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.