कोरेगाव, पुसेगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:44+5:302021-03-07T04:35:44+5:30
कोरेगाव : पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने दुपारी कोरेगाव आणि पुसेगावमध्ये धडक कारवाई करीत गुटखा विक्री ...
कोरेगाव : पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने दुपारी कोरेगाव आणि पुसेगावमध्ये धडक कारवाई करीत गुटखा विक्री व वाहतुकीचे रॅकेट उद्ध्वस्त केले. याप्रकरणी तीनजणांना अटक करीत सुमारे तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी फिर्यादी दिल्या आहेत.
कुमठे फाट्यानजीक अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती खास बातमीदाराने दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल कदम, सहायक उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे व कर्मचारी साहिल झारी यांनी गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सापळा रचला होता. पुसेगाव बाजूने कोरेगावात येत असलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीला त्यांनी अडविले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने स्वत:चे नाव जमील शफिक बागवान (रा. कळकाई गल्ली, कोरेगाव) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ९४ हजार ७४० रुपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी युवराज ढेंबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बागवान यास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे तपास करीत आहेत.
पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एका सलून दुकानामध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी १ लाख ९८ हजार ६३२ रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. सिद्धार्थ संजय भिसे (रा. निढळ, ता. खटाव) व आनंदा रामचंद्र चव्हाण, (रा. नेर, ता. खटाव) यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भिसे व चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. बी. लोंढे तपास करीत आहेत.