पोलिसांच्या तावडीतून पळालेल्यास पुण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:33 AM2018-03-05T00:33:47+5:302018-03-05T00:33:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
विश्रृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विश्रृत नवाते याच्यावर सातारा शहर, शाहूपुरी आणि सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे विविध प्रकारचे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. राजवाडा येथील एका दुकानातून इलेक्ट्रिक साहित्य खरेदी करून त्याने बोगस धनादेश दिला होता. या गुन्'ात तो फरारी होता. स्थानिक गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी त्याला या गुन्'ात अटक केली होती. चार दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने पोटात दुखत असल्याचे कारण सांगत जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये दाखल झाला. या ठिकाणी काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ९ फेब्रुवारीला त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, तरीही त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी गेली नाही.
यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याला ११ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडीत नेण्यात येत होते. यावेळी त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये पाणी पिण्याचा बहाणा करून पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पलायन केले. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. पुण्यामध्ये नवाते असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक शनिवारी रात्री तेथे दाखल झाले. एका दुकानात इलेक्ट्रिक साहित्य खरेदी करण्यासाठी तो आला असता सातारा पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या मदतीने पकडले.
दरम्यान, नवाते पळून गेल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एका पोलीस कर्मचाºयाला निलंबितही केले होते.
पळून गेल्यानंतरही पुन्हा तोच प्रयत्न..
एखाद्या दुकानामध्ये जाऊन साहित्य खरेदी करायचे. त्यांना बोगस धनादेश देऊन पोबारा करायचा, अशी नवातेची गुन्ह्याची पद्धत होती. पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळून गेल्यानंतरही तो सावज शोधण्याचा प्रयत्न करीत होता. पुण्यातील एका दुकानात साहित्य खरेदीसाठी तो येणार असल्याचे कळताच सातारा पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. पलायनानंतरही त्याचा फसवाफसवीच्या उद्योग सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले.