सातारा येथील पोलिसाने गोळी झाडून स्वत:लाच संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:30 PM2019-07-02T15:30:43+5:302019-07-02T16:30:06+5:30
कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी कोळकेवाडी येथे बंदोबस्ताचे काम करणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी सोमवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पाटील हे सातारा येथील असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून पुढे आलेले नाही. मात्र त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शिरगाव : कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी कोळकेवाडी येथे बंदोबस्ताचे काम करणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी सोमवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पाटील हे सातारा येथील असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून पुढे आलेले नाही. मात्र त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कोयनेच्या चौथ्या टप्प्यामध्ये कोळकेवाडी येथे इमर्जन्सी व्हॉल्ट टनेल आहे. तेथे शिरगाव पोलीस स्थानकाकडून बंदोबस्त ठेवला जातो. बंदोबस्ताच्या पोलिसांची राहण्यासाठी तेथेच राहण्याची व्यवस्था आहे. सातारा येथील सुनील पाटील हे गेली चार वर्षे शिरगाव (ता. चिपळूण) पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. ते सध्या कोळकेवाडी टनेल येथे कार्यरत होते.
सोमवारी दुपारी २.३0 वाजण्याच्या सुमारास वीज मंडळाचे सुरक्षा रक्षक तेथे गेले. पाटील यांच्या खोलीचा दरवाजा नुसता ढकललेला असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला असता आतमध्ये पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या हातात त्यांची बंदूक होती. हे दृष्य पाहून त्या सुरक्षा रक्षकांनी शिरगाव पोलिसांशी संपर्क साधला.
पोलीस घटनास्थळी रवाना झाले. मात्र पोलीस सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळीच असल्याने अधिक तपशील उपलब्ध झाला नाही. आत्महत्येचे नेमके कारणही अजून पुढे आलेले नाही. शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.