मुलींच्या एका कॉलवर पोलीस धावणार मदतीला, छेडछाड रोखण्यासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिला मोबाईल नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:05 PM2018-08-29T23:05:19+5:302018-08-29T23:09:24+5:30
शाळा, महाविद्यालय परिसरात युवतींची छेडछाड सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असते. हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा पोलिसांनी शाळा व महाविद्यालय संवाद अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खिशात
स्वप्नील शिंदे ।
सातारा : शाळा, महाविद्यालय परिसरात युवतींची छेडछाड सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असते. हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा पोलिसांनी शाळा व महाविद्यालय संवाद अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खिशात पोलीसदादाचा नंबर असणार आहे. त्यांच्या एका कॉलवर पोलीस त्यांच्या मदतीला धावण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मुलींना रक्षाबंधनची एकप्रकारेच भेट दिली आहे.
शाळा, महाविद्यालयाबाहेर टवाळखोर तरुण विनाकारण फिरत असतात. हे टवाळखोर मुलं मुलींची छेड काढतात. शाळेत जाताना, घरी येताना मुलींना त्रास देतात. मात्र, त्यांना समजून सांगणारे पालक, शाळेतील शिक्षक यांना मारहाण होते. याप्रकरणी गुन्हेही नोंदविले जातात. छेडछाडीच्या अशा घटनांनंतर पोलीस काही दिवस शाळांबाहेर गस्त घालून टवाळखोरांवर कारवाई करतात. त्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबतात; पण पुन्हा सुरू होतात. हे चित्र बदलण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा व महाविद्यालयात संवाद अभियान सुरू केले आहे.
यावेळी मुलींबरोबर संवाद साधून पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक मुलींना देण्यात आले. जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी धावडशी, वर्ये परिसरांतील शाळेत या संवाद अभियानाची सुरुवात केली आहे.
छेडछाड करणाºयांची गय नाही : देशमुख
मुलींनी तक्रार केल्यानंतर संबंधित पोलीस तत्काळ तक्रारीची दखल घेऊन मुलीला त्रास देणाºयावर कारवाई करतील. त्याचबरोबर निर्भया पथकाची गस्त नियमितपणे सुरूच राहणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
एका कॉलवर पोलीस धावणार मदतीला
प्रत्येक मुलीजवळ पोलिसाचा नंबर देण्यात आला आहे. मुलीने तक्रार केल्यानंतर काही वेळातच पोलीस कर्मचारी मदतीला जातील, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. सर्व विद्यार्थ्यांजवळ पोलिसांचे मोबाईल नंबर असल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये वचक बसले. त्यामुळे छेडछाडीचे प्रकार साहजिकच रोखले जातील, अशी आशा पोलिसांना आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे पोलिसांची नजर
छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी शाळा व्यवस्थापन अन् पोलीस प्रयत्न करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी आपले मोबाईल नंबर विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक शाळेचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्याच्या माध्यमातून पोलिसांची सर्व घडामोडींवर नजर राहणार आहे.