पोलिसांच्या ‘हिटलिस्टवरील’ गुन्हेगार सातारारोड येथे जेरबंद
By Admin | Published: March 8, 2015 12:13 AM2015-03-08T00:13:57+5:302015-03-08T00:15:04+5:30
कोरेगाव : धाकट्या भावाने पोलिसांना दिलेल्या टीपमुळे अट्टल चोरटा थोरला भाऊ पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला.
चाकण, (जि. पुणे) येथील पोलीस रेकॉर्डवर असलेला संशयित संतोष कांतिलाल गुजर (वय २६) याला सातारारोड येथून पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी सकाळी शिताफीने अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अट्टल गुन्हेगार संतोष गुजरला शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी चाकणमधून त्याचा धाकटा भाऊ विशाल गुजर (वय २३, रा. नाणेकरवाडी) याला सातारारोडला आणले.थोरला भाऊ संतोष हा गेल्या काही महिन्यांपासून सातारारोड येथे पत्नीसमवेत राहत होता. याची माहिती धाकटा भाऊ विशालला होती. त्यामुळे पोलिसांनी संतोषला पकडण्यासाठी त्याच्या भावाचाच कौशल्याने वापर केला. पुणे पोलिसांची टीम सातारारोडला पोहोचल्यानंतर पोलिसांनी संतोषला अटक केली. थोरला भाऊ सापडल्याचे दिसताच विशालने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन धोम डाव्या कालव्यात उडी घेतली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.
पुणे येथील चाकण भागामध्ये दरोडे, खून आणि मारामाऱ्या या सारखे गंभीर गुन्हे घडले होते. त्यामध्ये संघटित टोळ्यांचा सहभाग आहे. संतोष व विशाल गुजर यांच्या टोळीने पोलिसांना अक्षरश: जेरीस आणले होते. पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने तपास यंत्रणा राबवून टोळीच्या म्होरक्या विशाल यास जेरबंद केले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने टोळीतील महत्त्वाचा साथीदार आणि त्याचा थोरला सख्खा भाऊ संतोष यामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. तो आपल्या पत्नीसह सातारारोड येथील मोतीचंदनगरमध्ये खोली भाड्याने घेऊन वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे संतोष गुजर पर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले. (प्रतिनिधी)
आणखी गुन्हे उघडकीस येणार..
संतोष गुजर याची यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याच्यावर चाकणसह इतर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे आणि मारामाऱ्यांचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
त्याला अटक केल्याने आता संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होईल, असा विश्वास पुणे ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला. विशाल आणि संतोष गुजर यांना चाकण येथे अधिक तपासासाठी नेले आहे.