बसवेश्वर जयंतीनिमित्त पोलिसांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:36 AM2021-05-17T04:36:49+5:302021-05-17T04:36:49+5:30
कराड : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त नांदगाव (ता. कराड) येथील पोलीस औट पोस्टमधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या ...
कराड : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त नांदगाव (ता. कराड) येथील पोलीस औट पोस्टमधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या महामारी संकटात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना एन ९५ मास्क, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व बिस्किट पुडे यावेळी देण्यात आले.
कोरोना महामारी संकटामुळे यावर्षी महात्मा बसवेश्वर जयंती सार्वजनिकरित्या साजरी करता आली नाही. नांदगाव येथेही वीरशैव लिंगायत समाजाने घरगुती पद्धतीनेच बसवेश्वर जयंती साजरी केली. पण, याचे औचित्य साधून लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस कर्मचार्यांच्या सन्मानाचा उपक्रम राबवला.
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डांगे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सतीश कडोले, किशोर तांबवेकर, संजय तलबार, निरंजन माळी, गौरव कडोले, अनिकेत माळी आदी समाज बांधव उपस्थित होते. सामाजिक अंतर ठेवत हा कार्यक्रम झाला. लिंगायत समाजाने केलेल्या सन्मानाबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रशांत सुकरे म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजासाठी मोलाचे आहेत. त्यांनी समानतेचा संदेश दिला. त्यांचे विचार उराशी बाळगूनच हा छोटासा उपक्रम आम्ही राबवला आहे.
फोटो
नांदगाव (ता. कराड) येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने पोलीस कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.