पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत फिरू लागल्या ; कारण शाळकरी मुलीच्या अपहरणाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 09:11 PM2020-01-08T21:11:35+5:302020-01-08T21:14:47+5:30
पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत फिरू लागल्याने नक्की काय झाले याची माहिती घेण्यासाठी लोकांनी राजवाडा परिसरात गर्दी करण्यास सुरूवात केली.
सातारा : एका शाळेच्या परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरून करून निघालेल्या संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी वेळीच आवळल्याने अपहरणाचा डाव फसला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर चव्हाण, अमीत कुलकर्णी, अभिजीत शिंदे (सर्व रा. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये अज्ञाताने बुधवारी सकाळी दहा वाजता फोन करून साताऱ्यातील एका शाळेच्या आवारातून पांढ-या रंगाच्या कारमधून मुलीचे अपहरण केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करून शहरात नाकाबंदी केली. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत फिरू लागल्याने नक्की काय झाले याची माहिती घेण्यासाठी लोकांनी राजवाडा परिसरात गर्दी करण्यास सुरूवात केली.
यावेळी शहर वाहतूकच्या एका पोलीस कर्मचा-याने मोती चौकात नागरिकांसमोरच अपहरण करणाऱ्यांना पकडले. अपहरण झालेल्या मुलीसह संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अटक केलेल्या संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करत आहेत.