गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:52+5:302021-09-10T04:46:52+5:30
नांदगाव पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील गावात गणेश उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी; तसेच गणपती उत्सव शांततेत ...
नांदगाव पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील गावात गणेश उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी; तसेच गणपती उत्सव शांततेत व कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा केला जावा, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने गावातील रस्त्यांवरून संचलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा उभे राहून ग्रामस्थ हे पहात होते.
वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून गणेश उत्सव ओळखला जातो. प्रत्येक गावातील अनेक गणेश मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करतात; मात्र मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन गणेश उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली होती. यंदा त्यात थोडी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गावातील अनेक मंडळांनी मंडप उभारले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे बैठकही झाली. त्यात शासकीय सर्व नियम सांगण्यात आले. त्यानुसार गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यानुसार आज कराड पोलीस ठाण्याच्यावतीने येथे पोलीस संचलन करण्यात आले.
फोटो
काले ता. कराड येथे गणेश उत्सव निमित्ताने पोलीस प्रशासनाने मार्चिंग केले.