पोलिस पाटील भरतीला न्यायालयात आव्हान

By admin | Published: March 28, 2016 08:14 PM2016-03-28T20:14:14+5:302016-03-28T23:57:30+5:30

जनहित याचिका दाखल करणार : सामाजिक संघटनांसह अनुत्तीर्ण परीक्षार्थी उतरले रस्त्यावर

Police Patil Bharti challenged in court | पोलिस पाटील भरतीला न्यायालयात आव्हान

पोलिस पाटील भरतीला न्यायालयात आव्हान

Next


कऱ्हाड : येथील पोलिस पाटील पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत सामाजिक संघटनांनी आता न्यायालयाचा रस्ता धरण्याची तयारी सुरू केली आहे. या भरतीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले परीक्षार्थिही संघटनांबरोबर असून, न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा सुधारक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत घोडके व परीक्षार्थिंनी दिली. परीक्षेतील उत्तीर्ण, अनुत्तीर्ण उमेदवारांची यादी आठ दिवसांत प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जिल्हा सुधारक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने व अनुत्तीर्ण पोलिस पाटील भरतीतील उमेदवारांतर्फे सोमवारी तहसीलदार राजेंद्र शेळके व प्रांताधिकारी किशोर पवार यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी पवार यांनी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण उमेदवारांची तोंडी व लेखी परीक्षार्थिची यादी दोन दिवसांत जाहीर करतो, असे सांगितले. यावेळी दत्ताजी खुडे, दीपक खुडे, कृष्णत यादव, योगेश यादव, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, रविराज देसाई, संदीप कुंभार आदींसह नारायणवाडी, आटके, चौगुलेमळा, काले, अंतवडी, किरपे, अकाईचीवाडी, कुसूर या गावांतील उमेदवार उपस्थित होते.
शासनाने २० ते २३ मार्च या कालावधीत लेखी व तोंडी परीक्षा पोलिस पाटील भरतीच्या घेतल्या. त्यामध्ये लेखी परीक्षेचा निकाल २४ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान जाहीर केला. घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरतीतील लेखी व तोंडी परीक्षेतील परीक्षार्थिंच्या उत्तर पत्रिका कोणत्याही कारणाने नष्ट करण्यात येऊ नये, याची दखल घेण्यात यावी. कायदेशीर गोष्टी लक्षात घेण्यापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या पोकळ व अपूर्ण निकालाबाबत जिल्हा सुधारक सामाजिक संस्था ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. करण्यात आलेली भरती प्रक्रिया पूर्णत: रद्द करून फेर इनकॅमेरा लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. याबाबत शासनाने लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा सामाजिक विकास संस्थेतील पदाधिकारी व पोलिस पाटील भरतीतील अनुत्तीर्ण उमेदवारांनी केली आहे. (प्रतिनिधी)


तहसीलदारांपुढे मांडली
अनुत्तीर्ण उमेदवारांनी कैफियत
दहा ते बारा गावांतील अनुत्तीर्ण झालेल्या पोलिस पाटील भरतीतील उमेदवारांनी सोमवारी तहसील कार्यालयात येऊन आपली कैफियत मांडली. यावेळी चोवीसहून अधिक अनुत्तीर्ण उमेदवारांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या केबिनपुढे गर्दी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले निवेदन
सोमवारी दुपारी बारा वाजता तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर पोलिस पाटील भरतीतील अनुत्तीर्ण उमेदवारांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

या आहेत मुख्य मागण्या..
जाहीर करण्यात आलेल्या पोलिस पाटील भरतीमध्ये नेमणूक झालेल्या परीक्षार्थिंच्या यादीबरोबर अनुत्तीर्ण व उत्तीर्ण परीक्षार्थिंची तोंडी व लेखी परीक्षेचे गुण प्रसिद्ध केले नाही.
शासनाच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेमध्ये तोंडी व लेखी हे गुण एकत्रित करून त्याचे मूल्यमापन शासनाने ठरविलेल्या कायद्याच्या उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण परीक्षार्थी ठरविला जातो. मात्र, याप्रमाणे करण्यात आलेले नाही.
तसेच उत्तीर्ण-अनुत्तीर्ण परीक्षार्थिंची गुणयादी निकालासोबत जाहीर करावयाची नाही, असे काही राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळविले होते का?
कायद्याच्या व शासनाच्या कोणत्या नियमावलीप्रमाणे उत्तीर्ण व अनुत्तीर्ण परीक्षार्थिंचे गुण जाहीर न करता, फक्त उत्तीर्ण परीक्षार्थिंचे परीक्षा बैठक क्रमांक, गावाचे नाव, जात प्रवर्ग व परीक्षार्थिंचे नाव याच का जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचे स्पष्टीकरण द्यावे.


अनुत्तीर्ण उमेदवारांच्या
आंदोलनात
संघटनांची उडी
कऱ्हाड पोलिस पाटील भरतीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आपल्यावर भरतीनिवड प्रक्रियेदरम्यान अन्याय झाला असल्याचे सांगितले जात आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांच्याकडून आता तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे न्याय मागीतला जात असताना आता यांच्या आंदोलनात सामाजिक संघटनांनी देखील उडी घेतली आहे.

Web Title: Police Patil Bharti challenged in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.