साताऱ्यात मशिदींवर पोलिसांचा खडा पहारा, मनसे कार्यकर्त्यांवर वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:51 PM2022-05-04T12:51:19+5:302022-05-04T12:52:09+5:30
मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची लिस्ट तयार केली. प्रत्येक कार्यकर्त्यांवर लक्ष राहील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे.
सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातारा पोलिसांनी आज, बुधवारी शहरातील सर्वच मशिदींसमोर खडा पहारा ठेवला. तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर पोलिसांनी वॉच ठेवला असून, साध्या वेशातील पोलीस शहरात गस्त घालत आहेत.
राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यभरात सर्वत्र मनसेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असले तरी साताऱ्यात मात्र, याउलट परिस्थिती आहे. मनसे कार्यकर्त्यांनी काल, मंगळवारी सायंकाळी पोलिसांची परवानगी घेऊन राजवाडा परिसरातील हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, बुधवारी सकाळपासून पोलिसांनी शहरातील मशिदींसमोर बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची लिस्ट तयार केली. प्रत्येक कार्यकर्त्यांवर लक्ष राहील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. मशिदींसमोर शहरातील किती मंदिरे आहेत. याची यादीही पोलिसांनी तयार केलीय. या मंदिर परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांच्या मोबाइल लोकेशनवरही नजर
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अचानक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या माेबाइल लोकेशनवर लक्ष ठेवले आहे. सातारा शहरात ३६८ पोलीस आणि अधिकारी तैनात आहेत. याशिवाय जिल्ह्यातही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून, जे सुटीवर गेले होते. त्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.