कृष्णा नदीत उडी मारताना युवतीला पोलिसांनी अडविले
By Admin | Published: September 13, 2015 12:15 AM2015-09-13T00:15:33+5:302015-09-13T00:15:55+5:30
संगममाहुली पुलावरील घटना
सातारा : भरदुपारी रखरखतं ऊन.. संगममाहुली पुलावर वीस ते बावीस वर्षीय युवती कट्ट्यावर उभी राहिली होती. येणारे-जाणारे वाहनचालक तिच्याकडे केवळ पाहत पुढे निघून जात होते. ती युवती मागे-पुढे पाहत पुलावर उभी.. कोणत्याही क्षणी ती पुलावरून उडी टाकण्याची शक्यता.. मात्र, याचवेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांची गाडी तेथे पोहोचली अन् त्या मुलीचे प्राण वाचले.
कोरेगावहून येताना उजव्या बाजूला संगम माहुली पुलावर एक युवती कठड्यावर उभी राहिली होती. तोंडाला स्कार्प आणि पाठीवर कॉलेजची सॅक होती. बराचवेळ झाले ती त्याच ठिकाणी उभी होती. रस्त्यावरून येणारे-जाणारे वाहनचालक केवळ तिच्याकडे पाहून मार्गस्थ होत होते. आत्महत्या करण्याच्या हेतूने ती युवती त्या ठिकाणी उभी असावी, अशी शंका दुचाकीवरून येणाऱ्या दोघा युवकांना आली. त्या युवकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्या आणखी हालचाली वाढल्याने ते युवक तेथून काहीअंतरावर पुढे उभे राहिले. त्या युवकांना पाहून इतर वाहनचालकही थांबले. त्या युवतीला पुलावरून परत आणण्याचा त्या युवकांनी बेत आखला होता. मात्र, तोपर्यंत कोरेगाव बाजूकडून गस्त घालत पोलिसांची गाडी संगममाहुली पुलावर आली. त्या युवतीला पाहातच पोलिसांनीही गाडीची लाईट लावली. अन् क्षणातच गाडी पुलावर थांबली. गाडीतून महिला पोलीस आणि एक पोलीस कर्मचारी उतरले. त्यांनी त्या युवतीला कठड्यावरून खाली उतरून गाडीजवळ नेले. काहीवेळ पोलिसांनी तिच्याशी चर्चा केली. त्यानंतर तिला पोलीस व्हॅनमधून ठाण्यात नेण्यात आले. ती युवती तेथे कुठून आली. कोणत्या महाविद्यालयात शिकते. पुलाच्या कठड्यावर उभे राहण्याचा तिचा हेतू काय, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस त्या युवतीची चौकशी करत होते.
त्या ठिकाणाहून अनेकांनी केल्यात आत्महत्या !
संबंधित युवती ज्या ठिकाणी पुलावर उभी होती, त्याच ठिकाणाहून अनेकांनी उडी मारून आत्महत्या केल्या आहेत. असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. संबंधित युवतीही त्याच उद्देशाने तेथे घुटमळत होती. परंतु पोलीस आल्याने तिचे प्राण वाचले, अशी चर्चा घटनास्थळी होती. (प्रतिनिधी)