खुनाच्या अफवेने पोलीस कामाला-मायणीत घबराट;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 07:39 PM2018-04-30T19:39:00+5:302018-04-30T19:39:00+5:30
मायणी : मायणी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रविवारी दिवसभर रंगायला लागली. ही कुणकूण पोलिसांपर्यंतही पोहोचली. पोलिसांनी तातडीने दखल घेत माहिती गोळा केली; पण खून कोठे झाला? याची माहिती हाती लागेना. त्यामुळे त्यांनी सर्व वस्त्या पिंजून काढल्या. हाती काहीच न लागल्याने अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
मायणी परिसरात असलेल्या भिकवडीरोड, माळीनगर रोड, जमादार मळा या परिसरामध्ये लोकवस्ती असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. यावस्त्यांवर रात्री खून झाला असल्याची माहिती मिळत होती. वस्तीवर राहणारे लोक आपल्या वस्तीत नसून दुसºया वस्तीवर काहीतरी झाले आहे. दुसºया वस्तीवरचे तिसºयाच वस्तीवर खून झाल्याची चर्चा करत होते. हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दबक्या आवाजात खुनाविषयी चर्चा सुरू झाली.
पोलीस प्रशासनापर्यंत ही वार्ता रविवारी रात्री पोहोचली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी परिसरातील सर्व वाड्यावस्त्या फिरून चौकशी केली. कोठेच काही पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे ही अफवा असावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र खुनाची अफवा असली तरी संपूर्ण परिसरात दिवसभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
खून झाल्याची माहिती आमच्यापर्यंत आली होती. आमचे सर्व कर्मचारी त्या-त्या ठिकाणी पाठवून परिसरातील माहिती गोळा केली. मात्र ही अफवा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी केले.
परिसरातील जमादार मळा या ठिकाणी रविवारी रात्री खून झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. त्या चर्चेच्या आधारे गावामध्ये असणारे तीन जामदार मळे, भिकवडी रोड आदी ठिकाणी राहणाºया ग्रामस्थांकडे चौकशी केली. मात्र असं काही घडलंच नाही, असं उत्तर मिळालं.
- प्रशांत कोळी,पोली स पाटील, मायणी.