पोलिसांनी दिले प्रत्युत्तर; ‘आव्वाज नाय करायचा!’
By admin | Published: September 19, 2015 11:49 PM2015-09-19T23:49:33+5:302015-09-19T23:51:29+5:30
गणेशोत्सवात डॉल्बी : ध्वनी प्रदूषण झाल्यास कारवाई
सातारा : डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर बंदी घातलेली नाही, तसेच त्यांना दिलेल्या नोटीसीचा त्यांनी चुकीचा अर्थ काढला असून ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या अटीवर त्यांना उत्सव काळात परवानगी दिली जाईल. मात्र, नियमापेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण शहर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
डॉल्बी व्यावसायिकांनी शहर पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. मुकुंद सारडा यांना पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षी गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केले होते. त्यामुळे कायद्याचा भंग व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी लाऊड स्पीकर, डीजे डॉल्बी, बेन्जो, म्युझिक सिस्टिम हे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांना पुरवू नयेत, या आशयाची नोटीस २८ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय, शासन व प्रचलित कायदा व नियम यांच्याद्वारे दिली गेली होती. मात्र कायद्याचे पालन करणाऱ्या कुठल्याही व्यावसायिकाला बंदी घातलेली नाही. (प्रतिनिधी)
उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
जिल्हा डॉल्बी संघटनेच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने याबाबत म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांना २२ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संघटनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.