कऱ्हाडात पोलिसांचे ‘दंगा काबू’ प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:23+5:302021-09-10T04:47:23+5:30
कऱ्हाड तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या अजून कमी होताना दिसत नाही. अशातच विविध सणासुदीचे दिवस असून, यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ...
कऱ्हाड तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या अजून कमी होताना दिसत नाही. अशातच विविध सणासुदीचे दिवस असून, यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. सर्वसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. दंगल झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस हेल्मेट, लाठी, ढाल, रायफल, गॅस गन, फायर ब्रिगेड गाडी, रुग्णवाहिका घेऊन कसे सज्ज आहेत, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पोलिसांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी लक्ष्मी देवी मंदिर परिसरात गर्दी झाली होती. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कशा पद्धतीने सतर्क असतात, हे यावेळी दाखविण्यात आले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक सराटे, आनंदराव खोबरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कऱ्हाड शहर, ग्रामीण, उंब्रज, तळबीड, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी हजर होते.
- चौकट
कडक पोलीस बंदोबस्त तैनात
पावस्कर गल्ली, दर्गा मोहल्ला, चांदणी चौक, आंबेडकर पुतळा चौक, पालकर वाडा, चावडी चौक याठिकाणी प्रात्यक्षिकावेळी कडक पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. दंगा काबू प्रात्यक्षिक संपल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
फोटो : ०९केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडात दंगा काबू प्रात्यक्षिकानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.