जिल्हा परिषदेच्या गेटवर आता पोलीस बंदोबस्त..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:55+5:302021-04-29T04:30:55+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यातच मागील काही दिवसांत अनेक ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यातच मागील काही दिवसांत अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असून मुख्य गेटवर पोलीस बंदोबस्त आहे. नागरिकांना नो एंट्री असून विचारपूस करून व महत्त्वाचे काम असेल तरच प्रवेश दिला जात आहे.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज शेकडोंच्या पटीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य व विस्तारित इमारतीत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच दरवाजा उघडा ठेवण्यात आला आहे. इतर पर्यायी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आवारात पदाधिकारी, सदस्य आणि शासकीय कर्मचारी सोडून इतरांच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्यांची तपासणीही करण्यात येत आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणखी सावध झाले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत येणाऱ्यांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. मुख्य गेटच सुरू असून तेथून ये-जा करावी लागते आहे. तरीही अनेक नागरिक सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालतात. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. यासाठी आता दोन पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे किरकोळ कामासाठी येणाऱ्यांनाही चपराक बसली आहे.
चौकट :
अशा आहेत उपाययोजना...
- प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात लोकांना प्रवेशबंदी
- कार्यालयात न येता ई - टपाल प्रणालीद्वारे अर्ज करावेत. तसेच माहिती मिळवावी. यासाठी संबंधित विभागाने मेल आयडी व संपर्क क्रमांक देण्याची सूचना करण्यात आली आहे.
- येणाऱ्या अर्जावर निश्चित वेळेत कार्यवाही करावी. तसेच त्याची माहिती संबंधितांना कळविण्याची जबाबदारी विभागावर राहणार आहे.
फोटो दि.२८ सातारा झेडपी नावाने...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्यांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे मुख्य गेटवर आता पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (छाया : नितीन काळेल)
..............................................