साताऱ्याच्या खंडणीला पोलिसांनी चाप बसवावा
By admin | Published: June 15, 2017 10:43 PM2017-06-15T22:43:23+5:302017-06-15T22:43:23+5:30
साताऱ्याच्या खंडणीला पोलिसांनी चाप बसवावा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र खंडणीचे प्रताप वाढल्याने या कामाची निविदा घेण्यासाठी एकही ठेकेदार धजावत नसल्याने बांधकाम विभागाला पुन्हा-पुन्हा निविदा काढावी लागत आहे. खंडणीच्या प्रतापापायी सातारा शहराचा विकास खुंटवायचा का? असा गंभीर आणि वास्तववादी सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला असून खंडणीखोरांना चाप बसवून विकासाला गती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिध्दी पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, नगरपालिका निवडणुकीच्या काळातच मी साताऱ्यात खंडणीराज चालू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी लोकांना हा विषय पटला नाही. किंबहुना लोकांनी या विषयाकडे फारशे गांभिर्याने पाहिले नाही. परंतु सद्यस्थितीला कोणाचे रुप काय आहे? मुखवट्याआड कोणता चेहरा लपलेला आहे हे स्पष्ट झाले आहे. काही गोष्टी बाहेर आल्या आहेत आणि अनेक गोष्टी बाहेर पडायच्या राहिल्या आहेत. सातारा शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून याठिकाणी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. मंजुरीला बराच काळ लोटला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त निविदा काढण्याचेच काम चालू आहे. यापुढे काहीही होत नाही याला खंडणीराज कारण आहे हे ही निष्पन्न झाले आहे. वास्तविक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून खंडणीखोरांची नावे थेट पोलिस अधिक्षकांना सांगणे गरजेचे आहे. यानंतर पोलिस अधिक्षकांनीही खंडणीसारखे प्रताप करुन विकासाला खिळ बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
खंडणी हा विषय केवळ बांधकाम विभागापुरता मर्यादीत नाही. बांधकाम विभागासह कृषी विभाग, पाटबंधारे, जलसंधारण यासह अनेक विभागांमध्ये खंडणीराज सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या विकासकामांमध्ये कोणाच्या नावाखाली खंडणी मागितली जाते. कोणामुळे विकासकामे अडवून ठेवली जातात, याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली पाहिजे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनीही खंडणी सारखे प्रताप करुन जनतेसाठीच्या विकासकामांना खिळ घालणाऱ्यांची नावे कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट पोलिस प्रमुखांना सांगितली पाहिजेत. मात्र असे न झाल्याने, दहशत आणि दडपशाहीमुळे खंडणीराज फोफावले आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांनीच ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत. खंडणीखोरांना तुरुंगात डांबले पाहिजे.
पोलिसांनी कोणाचीही गय करु नये...
शांत आणि शिस्तप्रिय सातारा शहरात खंडणीराज कोणामुळे आणि केव्हापासून सुरु झाले? याचा विचार सुज्ञ सातारकरांनी केला पाहिजे. खंडणी म्हणजे विकासकामांना जडलेला कॅन्सरच आहे. कॅन्सरचा आजार वाढला की उपचारांचा उपयोग होत नाही, तीच परिस्थिती विकासकामांची झाली आहे. विकासकामांना गती देण्यासाठी खंडणी सारख्या गुन्ह्यांचे आॅपरेशन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने खंडणीसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे. विकासकामांना जडलेला खंडणीचा कॅन्सर बळावण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत. कोणाचीही गय न करता ठोस पावले उचलून हा आजार मुळापासून दूर करावा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.