तळ्यात विसर्जन करणाऱ्यांची थेट पोलिस ठाण्यात वरात
By admin | Published: September 10, 2016 11:59 PM2016-09-10T23:59:45+5:302016-09-11T00:24:59+5:30
मंगळवार तळ्यावर राडा : संध्याकाळनंतर बाप्पांचे शांततेत विसर्जन
सातारा : विसर्जनासाठी प्रतिबंधित असलेल्या मंगळवार तळ्यातच विसर्जन करणार असा आग्रह करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील कोळेकर यांना पोलिसांनी अटकाव करत थेट पोलिस ठाणे दाखवले. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर तळ्याशेजारी पालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या हौदात नागरिकांनी गणपती बाप्पांचे विसर्जन केले.
गतवर्षी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मंगळवार तळ्यात गणपती विसर्जनावर बंदी आणली होती. न्यायालयाची ही बंदी झुगारून परिसरातील काही नागरिकांनी तळ्यातच गणपती विसर्जनाचा हट्ट धरला. त्यांना अटकाव करण्याचाही यावेळी प्रयत्न करण्यात आला. प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी गणपतीची मूर्ती रस्त्यावरच ठेवून विसर्जनाची परवानगी देण्याचा आग्रह धरला. काही वेळाने या मूर्ती घेऊन संबंधित लोक मंगळवार तळे परिसरातून इतरत्र निघून गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपा शहराध्यक्ष सुनील कोळेकर येथे दाखल झाले. यावेळी पोलिसांबरोबर कोळेकर यांची शाब्दिक खडाजंगी झाली. ‘कोणत्या कायद्याने तुम्ही आम्हाला आडवता, आम्हाला आमच्या पद्धतीने सण साजरे करू द्या,’ अशी मागणी त्यांनी केली. जोरदार वादावादी आणि धक्काबुक्कीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर कोळेकर यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, तळे परिसरात झालेल्या या तणावपूर्ण प्रकारामुळे परिसरात याची जोरदार चर्चा सुरू होती. तळे परिसरात पाण्याने भरलेले चार हौद पालिकेच्या वतीने ठेवण्यात आले होते. हा प्रकार घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी संध्याकाळी उशिरापर्यंत भक्तिपूर्ण वातावरणात शांततेत तळे परिसरात गणपती विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तळे परिसरात तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
तळ्यात विसर्जन... न्यायालयाचा अवमान
मंगळवार तळ्यात गणपती विसर्जनाला बंदी आणण्यात यावी यासाठी गतवर्षी आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने तळ्यात विसर्जनाला बंदी घातली होती व त्याविषयीची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने करावी, असे निर्देश दिले होते. तळ्यात कोणीही कोणत्याही कारणाने गणपती विसर्जन केले तर तो न्यायालयाचा अवमान होईल, असेही या निकालात नमूद करण्यात आले आहे.