..अन् त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षकालाच केली धक्काबुक्की, दोघांवर गुन्हा दाखल
By जगदीश कोष्टी | Published: August 27, 2022 04:56 PM2022-08-27T16:56:38+5:302022-08-27T16:57:13+5:30
‘तू माझ्यावर कशी कारवाई करतो, तेच मी बघतो’ असे म्हणत शर्टची कॉलर पकडली.
कोरेगाव (सातारा) : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करत बसलेल्यांना ‘गोंधळ करू नका’ असे म्हटले असता दोघांनी थेट पोलीस उपनिरीक्षकालाच शिवीगाळ दमदाटी करत धक्काबुक्की केली. ‘तू माझ्यावर कशी कारवाई करतो, तेच मी बघतो’ असे म्हणत शर्टची कॉलर पकडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय लालासाहेब पवार व संकेत राजू जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. सातारा-लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात जुना मोटार स्टँडसमोर काल, शुक्रवारी सायंकाळ ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, अक्षय पवार व संकेत जाधव हे शनिवारी रात्री सातच्या सुमारास काळ्या रंगाची कार (एमएच ११-एएफ १) मधून जुना मोटार स्टँड परिसरात आले होते. सार्वजनिक ठिकाणी ते गोंधळ करीत असल्याने पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षय पवार याने कदम यांच्या शर्टची कॉलर पकडून एकेरी भाषेत ‘तू माझ्यावर कशी कारवाई करतो तेच मी बघतो?’ असे म्हणत धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
कदम यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस पथकाने जुना मोटार स्टॅन्डकडे धाव घेत अक्षय पवार याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारही ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करीत आहेत.