पोलिसांचा वीकेंड लाॅकडाऊनला जनजागृतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:12+5:302021-04-12T04:37:12+5:30
सातारा : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनला दुकानदार, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लसीकरण ...
सातारा : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनला दुकानदार, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लसीकरण व कोरोना चाचणीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला. विशेषत: विनामास्क लोक पोलिसांना रस्त्यावर आढळलेच नाहीत.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. शनिवारी पहिल्या दिवशी फळविक्रेते सोडून इतर सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. दुकाने बंद करा, असे पोलिसांना सांगावे लागले नाही. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या लाॅकडाऊन काळात कुठेही पोलिसांकडून मारझोड करण्यात आली नाही. लसीकरण किंवा कोरोना चाचणीसाठी लोक घराबाहेर पडत होते. अशा लोकांशी बोलून खात्री केल्यानंतरच त्यांना पोलीस सोडून देत होते. कारणाशिवाय बाहेर फिरू नका, असे पोलीस आवाहन करत होते. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क लावल्यामुळे विनामास्कच्या कारवाया या दोन दिवसात झाल्या नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.