या कारचे स्पीड पाहून पोलीस आवाक् झाले... : जीवघेण्या वेगाने नागरिकांना धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 07:54 PM2020-01-22T19:54:50+5:302020-01-22T19:56:05+5:30
भुर्इंज टॅबच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील जोशी विहीरजवळ स्पीडगन असलेली कार उभी केली होती. त्यावेळी दुपारच्या सुमारास सातारा बाजूकडून एक भरधाव कार पुण्याच्या दिशेने जात होती. या कारचे स्पीड पाहून पोलीस आवाक् झाले.
सातारा : गेल्या काही महिन्यांपूर्वी महामार्गपोलिसांना अत्याधुनिक अशा दोन स्पीडगन मशीन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भुर्इंज आणि क-हाड टॅबचा समावेश आहे. महामार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक वाहनांचा वेग स्पीडगनद्वारे मोजण्यात येत आहे. भुर्इंज टॅबच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील जोशी विहीरजवळ स्पीडगन असलेली कार उभी केली होती. त्यावेळी दुपारच्या सुमारास सातारा बाजूकडून एक भरधाव कार पुण्याच्या दिशेने जात होती. या कारचे स्पीड पाहून पोलीस आवाक् झाले.
काळजाचा थरकाप उडवून देणा-या या कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे एखादा भीषण अपघात घडण्याची शक्यता होती. डोळ्याचे पाते लवतेय तोच संबंधित कार पोलिसांसमोरून निघून गेली. वा-याच्या वेगाने धावणा-या संबंधित कारचे स्पीडही तितक्याच वेगाने मशीनमध्ये कैद झाल्याने अत्याधुनिक मशीनलाही पोलिसांकडून दाद देण्यात आली आहे. आत्तापर्यंत काही चालकांनी १५० पर्यंत वेगाची मर्यादा ओलांडली होती. मात्र, १७१ स्पीड हे गेल्या वर्षभरातील उच्चांक असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी सांगितले.
महामार्गावर कारसाठी ९० च्या स्पीडची मर्यादा असताना एका कार चालकाने तब्बल १७१ च्या स्पीडने कार चालवून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडवून दिला. सुरुवातीला संबंधित कारचे १७५ स्पीड होते. स्पीडगनच्या अगदी नजीक आल्यानंतर त्या कारचे स्पीड १७१ झाले. हे जीवघेणे स्पीड मशीनमध्ये कैद झाले आहे. हा सारा प्रकार पोलिसांकडे असलेल्या स्पीडगनमध्ये कैद झाला असून, संबंधित चालकाला एक हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
- हीच ती कार..
महामार्गावरून १७१ च्या स्पीडने धावणाºया कारचा एमएच १४ एचडब्यू ७७४९ असा नंबर आहे. महामार्गावर स्पीडची मर्यादा ९० ची असताना ही कार १७१ च्या स्पीडने धावली. पोलिसांनी अशा बेदरकार वाहन चालकांवर करडी नजर ठवेली आहे.