सदावर्तेंच्या कोठडीबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, न्यायालयात आज हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:24 AM2022-04-18T11:24:34+5:302022-04-18T11:24:52+5:30
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा : आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची रविवारी पोलीस ठाण्यात एक तास कसून चाैकशी करण्यात आली. त्यानंतर जाबजबाब झाल्यानंतर त्यांना पुन्हा कोठडीत नेण्यात आले. दरम्यान, बारामती येथे सदावर्तेंना काळे फासणाऱ्यांना बक्षीस जाहीर केल्याने सातारा पोलिसांनी सदावर्तेंच्या कोठडीसमोरील बंदोबस्तात आणखी वाढ केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सदावर्ते यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने पुणे येथे फाॅरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी ॲड. सदावर्ते यांना पुन्हा कोठडीतून बाहेर काढण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यातील केबिनमध्ये त्यांची तासभर चाैकशी करण्यात आली.
कोल्हापूर पोलिसांचा ताबा मिळण्यासाठी अर्ज
ॲड. सदावर्ते यांच्यावर कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कोल्हापूर पोलिसांनी मुंबई येथील गोरेगाव न्यायालयात सदावर्तेंचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. सातारा न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सदावर्तेंना आर्थररोड कारागृहात नेले जाणार आहे. त्यानंतर तेथून कोल्हापूरच्या पोलिसांकडे त्यांचा ताबा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.