श्वानपुत्रासाठी पोलिसांचा भल्यापहाटे हायवेवर पाठलाग
By Admin | Published: February 3, 2015 11:06 PM2015-02-03T23:06:55+5:302015-02-04T00:01:53+5:30
‘बिनतारी’वरून चोरीचा संदेश : पुणे जिल्ह््यातील पाच सधन युवकांना तातडीने अटक
राहुल तांबोळी - भुर्इंज -घरी बागायत. घरासमोर विविध मॉडेल्सच्या चारचाकींबरोबरच वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांचीही फौज. मात्र, इतके असूनही एका अडीच महिन्याच्या डॉबरमॅन जातीच्या कुत्र्यावर जीव जडला अन् पाची बोटं तुपात असलेले हात चोरीसाठी सरसावले. पाचवड, ता. वाई येथून मध्यरात्री साडेअकरा वाजता कुत्र्याचे पिल्लू चोरून पाच युवक पळाले खरे; पण त्या पिलावर जीव असणाऱ्या मालकाने चोरी झालेल्या पिलासाठी पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावले अन् एका कुत्र्याच्या पिलासाठी सुरु झाला भल्या पहाटे पोलिसांचा थरारक पाठलाग. रात्री एक वाजता पोलिसांनी जोशीविहीर येथे कुत्र्यासह पाच युवकांना पकडले. याबाबत माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड येथे हॉटेल लक्ष्मीच्या पाठीमागे हॉटेलचे मालक अजित जाधव राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी १५ हजार रुपयांना खरेदी केलेले डॉबरमॅन जातीचे कुत्र्याचे पिलू घराबाहेर खिडकीला बांधून ठेवले होते. मध्यरात्री साडेबारा वाजता कुत्रे ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे अजित जाधव यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दाराला बाहेरून कडी लावली असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी खिडकी उघडून पाहिले असता काही जण कुत्र्याच्या पिलाला पळवून नेताना दिसले. जाधव यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली.
रात्रगस्तीवर असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना बिनतारेवरून घटनेची खबर समजताच त्यांनी महामार्गावर तपासणीस सुरुवात केली. त्यावेळी दोन दुचाकीवरून पाच युवक कुत्र्याचे पिलू घेऊन जाताना त्यांना दिसले.
त्यांनी त्या दुचाकींचा पाठलाग सुरू केला. जोशीविहीर येथे त्या दुचाकींना पोलीस गाडी आडवी मारुन युवकांना कुत्र्याच्या पिलासह ताब्यात घेतले. याप्रकरणी अजित सोपान साळुंखे, राहुल निवृत्ती साळुंखे, सागर रामचंद्र गायकवाड (सर्व. रा. सावरदरे, ता. भोर) आणि प्रशांत महादेव शिंदे, अजित किसन शिंदे (रा. जांब, ता. वाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हवालदार पी. व्ही. हजारे तपास करीत आहेत.
‘सनी’ला पाहताच डोळ्यात आनंदाश्रू
कुत्र्याचे पिलू चोरीला गेल्याने जाधव यांच्या घरी हलकल्लोळ माजला होता. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या या पिलाचे ‘सनी’ नाव ठेवले होते. सनी हरवला म्हणून घरातील सारेच चिंतेत होते. पहाटे साडेतीन वाजता जाधव यांनी ‘सनी’ सापडल्याचे फोनवरून सांगितल्यानंतर साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
जेवायला आले अन् कुत्रे पळविले
सावरदरे येथील युवक जांब येथे मित्रांकडे जेवायला आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी हा उद्योग केला. त्यांचे कुटुंबीय जेव्हा पोलीस ठाण्यात आले, तेव्हा ‘एका कुत्र्याच्या पिलासाठी हा उद्योग कशासाठी केला, सांगितले असते तर अशी दहा कुत्री आणून दिली असती, अशा प्रश्नांची सरबत्ती केली.
सुरुवातीला पोलीस कुत्र्याच्या चोरीची दखल घेतील की नाही, अशी शंका वाटत होती. पोलिसांनी स्वत: पाठलाग करून आमचा ‘सनी’ आम्हाला परत मिळवून दिला.
- अजित जाधव