पोलीसदादा घेतील आता आस्थेने दखल !
By admin | Published: July 12, 2014 11:45 PM2014-07-12T23:45:34+5:302014-07-12T23:48:21+5:30
पोलीस अधीक्षकांचा नवा फंडा : प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल नंबरसह झळकल्या पाट्या
दत्ता यादव ल्ल सातारा
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अथवा चौकशीसाठी येणाऱ्या व्यक्तीला अनेकवेळा वागणूक व्यवस्थित मिळत नसते. परिणामी पोलिसांविषयी गैरसमज वाढत जातात. बऱ्याचदा तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यावेळी नेमके कोणाशी बोलावे, तक्रारदाराला सुचत नाही. तसचे बहुतांशवेळा पोलिसांकडून उद्धट वर्तन होत असल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एक नवा फंडा अंमलात आणला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या मोबाईल नंबरसह पाट्या झळकल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आता पोलीसदादा आस्थेने दखल घेतील.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीला चांगली वागणूक दिली जात नाही, हा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव असेल. तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार समजून अरेरावीची भाषा वापरली जाते.
त्यामुळे त्या व्यक्तीवर अन्याय होत असतो. परिणामी तो तक्रार न देताच घरचा रस्ता धरतो. यापूर्वी पोलीस ठाण्यात केवळ तक्रार न घेतल्यामुळे पोलिसांवरही खोटे आरोप झालेले आहेत. त्यामुळे विनाकारण पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर जात होती.
एखादा नवखा माणूस पोलीस ठाण्यात गेलाच तर तो कावऱ्या बावऱ्या होतो. कोठे चौकशी करायची, कोणाला काय विचारायचे, हे समजत नसते. तेथे असलेल्या पोलिसांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही तर कोणाला भेटायचे, असा मोठा प्रश्न उपस्थित होत असतो.
अधिकारी व पोलिसांच्या खिशावर केवळ त्यांची नावे लिहिलेली असतात; परंतु समजा कोणी तक्रार अथवा म्हणणे ऐकून घेतलेच नाही तर कोणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न तक्रारदारासमोर निर्माण होत असतो. या समस्यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस डॉ. अधीक्षक अभिनव देशमुख यांनी वेगळाच फंडा अंमलात आणला आहे.
पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदाराशेजारी एक पाटी लावली आहे. आपली तक्रार नोंदवून न घेतल्यास किंवा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने तुमचे म्हणणे ऐकून न घेतल्यास, टाळाटाळ केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्या पाटीवर करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे आणि अन्य एका अधिकाऱ्याचा नंबर त्या पाटीवर देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर पोलीस ठाण्यात ही ‘आस्थेची’ पाटी झळकत आहे.
पोलीस ठाण्यात येणारे नागरिक ही पाटी वाचून समाधान व्यक्त करत आहेत. या सूचना फलकामुळे तरी पोलीस नक्कीच आस्थेने तक्रारदाराशी वागतील आणि नागरिकांचाही पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होईल.