मूकबधिर मुलावरील केस पोलीस मागे घेणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 AM2021-02-20T05:51:36+5:302021-02-20T05:51:36+5:30
सातारा: बसस्थानकातील पाच शिवशाही बसेसच्या जळीतकांड प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या मूकबधिर मुलावरील केस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
सातारा: बसस्थानकातील पाच शिवशाही बसेसच्या जळीतकांड प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या मूकबधिर मुलावरील केस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात लवकरच न्यायालयात पोलीस अहवाल पाठविणार आहेत.
सातारा बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या पाच शिवशाही बस दोन आठवड्यांपूर्वी आगीमध्ये जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी एका अल्पवयीन मूकबधिर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्या मुलाला चाैकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर दुभाषकाद्वारे त्याचा पोलिसांनी जबाब घेतला. दोन युवक बसमध्ये सिगारेट ओढत होते. त्या मुलांनीच आग लावली. गाडीत धूर दिसू लागल्यानंतर मी पळत गाडीतून बाहेर आलो, असा जबाब त्या मुलाने पोलिसांना दिला. शिवशाहीच्या मॅनेजरच्या तक्रारीनुसार या संबंधित मूकबधिर मुलावर गुन्हा दाखल झाला असला, तरी अशाप्रकारे त्याने जबाब दिल्यामुळे पोलिसांचाही नाईलाज झाला. इतर संशयित आरोपींप्रमाणे त्याच्याकडे धड चाैकशीही करता येइना, त्यामुळे पोलीस हतबल झाले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार दोन युवकांनी आग लावली आहे. आता या अज्ञात दोन युवकांना पोलिसांना शोधावे लागणार आहे. तत्पूर्वी मूकबधिर मुलावर दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा लागणार आहे. यासाठी पोलिसांनी गुन्हा मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या जळीतकांड प्रकरणाला अशाप्रकारे कलाटणी मिळाल्याने मग बसेसना आग कोणी लावली, याचे गूढ आणखीच वाढले.