पोलिसाचा महिला पोलिसावर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 03:47 PM2019-07-24T15:47:17+5:302019-07-24T15:50:23+5:30
पोलीस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून अनिल सुभाष पवार (वय २७, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सातारा : पोलीस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून अनिल सुभाष पवार (वय २७, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार युवती २२ वर्षांची आहे. ती सध्या पोलीस म्हणून कार्यरत आहे. पोलीस युवतीची व अनिल पवार याच्याशी ओळख आहे. या ओळखीतूनच संशयित पवार याने पोलीस युवतीवर जबरदस्तीने अत्याचार केला.
यानंतर संशयिताने तुझ्याशी लग्न करतो, असे वचन दिले. यातून संशयिताने पोलीस युवतीकडून घर बांधण्यासाठी ५० हजार रुपये घेतले. बराच कालावधी गेल्यानंतर पोलीस युवतीने अनिल पवार याला लग्नाबाबत विचारल्यानंतर त्याने नकार दिला. तसेच त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यासही नकार देऊन पोलीस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली.
दरम्यान, संशयित अनिल पवार या पोलिसाच्या कुटुंबीयांनीही पोलीस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली आहे. याबाबत पोलीस युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. ही सर्व घटना १७ जुलै २०१८ ते १४ जून २०१९ या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीवरून पोलिसांनी सांगली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अनिल पवार याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास महिला फौजदार वर्षा डाळिंबकर या करीत आहेत.