युवकांसह पोलिसांची ‘पाणीदार’ माणुसकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:18 AM2018-10-02T00:18:05+5:302018-10-02T00:18:11+5:30

Police with 'youthful' humanity! | युवकांसह पोलिसांची ‘पाणीदार’ माणुसकी!

युवकांसह पोलिसांची ‘पाणीदार’ माणुसकी!

googlenewsNext

मल्हारपेठ : युवकांच्या सतर्कतेमुळे सोमवारी नवारस्ता येथे १७ गाई तर ढेबेवाडीत ३० बैलांची सुटका झाली. संबंधित जनावरांना जीवदान मिळाले. संबंधित जनावरे पोलीस ठाण्याच्या आवारात बांधल्यानंतर त्यांच्या दिवसभराच्या पालन पोषणाची जबाबदारीही संबंधित युवकांनी घेतली. जनावरांसाठी यावेळी माणुसकी धावल्याचे यावेळी दिसून आले.
चिपळूण ते नवारस्ता यादरम्यान असलेले पाच तपासणी नाके पार करून ७० किलोमीटर अंतर आलेल्या गाड्या अखेर नवारस्ता येथे थांबविण्यात आल्या. या गाड्या पाच तपासणी नाके ओलांडून आल्याच कशा, हा प्रश्न सध्या अनेकांना सतावत आहे. नाडोली येथील रामदास कदम हे सोमवारी पहाटे व्यायामाला जात असताना नवारस्ता येथे त्यांना पिकअप जीपमधून गायी नेल्या जात असल्याचे दिसले.
त्यानंतर त्यांनी हा प्रकार गावातील युवकांना सांगून संबंधित जीप अडवल्या. संबंधित पिकअप जीप चिपळूणहून इस्लामपूरकडे निघाल्या होत्या. या जीपसोबत एक कारही (एमएच ०४ सीजी ८८०१) होती. युवकांनी जिपसह संबंधित कार अडवली. त्यामधील पाचजणांसह एका महिलेला त्यांनी गायींबाबत जाब विचारला. त्यावेळी सर्वांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, ज्यावेळी चालकांना युवकांनी चोप दिला त्यावेळी संबंधित जनावरे कत्तलखान्याकडे नेली जात होती, असे स्पष्ट झाले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले. पिकअप जीपमधील सर्व जनावरांची मुक्तता केली. यावेळी एक वासरू मृत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवकांनी संताप व्यक्त केला.
ढेबेवाडी पोलिसांनीही सोमवारी सकाळी मालदन घाटात दोन टेम्पो अडवून २९ बैलांची सुटका
केली. यावेळी एका बैलाचा गुदमरून टेम्पोतच मृत्यू झाल्याचे समोर
आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून
मुक्तता केलेली जनावरे रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्याच ताब्यात होती. पोलिसांसह ग्रामस्थांनी त्या जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय केली.
पोलीस ठाणे आवारात जनावरांचा संचार
मल्हारपेठ पोलीस चौकीला सोमवारी बाजारतळाचे स्वरुप आले. पोलीस चौकीसमोर जिकडे-तिकडे गाई, लहान वासरे बांधलेली होती. त्यांना सुरुवातीला चाऱ्याची सोय नव्हती. मात्र, चारा नसला तरी पोलिसांच्या माणुसकीचा अनुभव येथे आला. एका व्यक्तीस पोलिसांनी संपूर्ण जनावरांना दिवसातून पाणी पाजण्यास सांगितले होते. तर दुपारनंतर पोलीस चौकीचे गेट बंद करून संपूर्ण जनावरे चरण्यासाठी मोकळी सोडली होती.
पोलिसांना सांगू नका, ‘सेटलमेंट’ करू...
कºहाड-पाटण मार्गावर नवारस्ता चौकात संबंधित जीप युवकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांना हुलकावणी देत संबंधित जीप वेगात कºहाडच्या दिशेने गेल्या. त्यावेळी युवकांनी पाठलाग करून काही अंतरावर तेलेवाडी येथे जीप अडवल्या. जीपमध्ये गायी-वासरे असल्याचे लक्षात येताच गाडीच्या चाव्या त्यांनी ताब्यात घेतल्या. यावेळी तुम्ही पोलिसांना कळवू नका, सेटलमेंट करू, अशी आॅफर संबंधित देत होते, असे युवकांनी सांगितले.
युवकांनी दिली खाद्याची पोती
सकाळी गाई-वासरांना पोलीस चौकीत आणून बांधून ठेवले. दुपारी एक वाजेपर्यंत मृत वासराचे शवविच्छेदन करेपर्यंत जनावरे उन्हात होती. त्यांना चारा नव्हता. मात्र पाणी पाजण्याची सोय केली होती. दुपारी तीन वाजता नवारस्ता येथील गोरक्षक कार्यकर्त्यांनी दोन खाद्याची पोती आणून संपूर्ण गायींना खाद्य घातले.
गायींच्या हंबरण्यामुळे झाला भांडाफोड
येराड हद्दीत वाहनांमध्ये गायींच्या हंबरण्याचा आवाज व्यायाम करणाºया ग्रामस्थांना आला. त्यामुळे ग्रामस्थांनी ही माहिती युवकांना दिली. युवकांनी पाटण व नवारस्ता येथे फोन करून संबंधित पिकअप जीपबाबत माहिती दिली. गायींच्या हंबरण्यामुळे संबंधित सर्वच गायींची सुटका करण्यात युवकांना यश आले.
दमदाटी केल्यामुळे युवक संतापले
युवक सेटलमेंटच्या आॅफरला जुमानत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांनी दमदाटी सुरू केली. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी सर्वांनाच चोप दिला. तसेच घटनास्थळी आलेल्या पोलिसांनाही युवकांनी धारेवर धरले. गायी कोणत्या गोशाळेत पाठविणार, त्याची पोहोचपावती दोन दिवसांत दाखवावी, तसे न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा युवकांनी दिला.

Web Title: Police with 'youthful' humanity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.