पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसालाच मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:09+5:302021-03-09T04:43:09+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील हुमगाव येथे पती आणि पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कुडाळ पोलीस स्टेशनचे हवालदार पद्मसिंह संभाजीराव घोरपडे ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील हुमगाव येथे पती आणि पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कुडाळ पोलीस स्टेशनचे हवालदार पद्मसिंह संभाजीराव घोरपडे ( वय २८) यांना महिलेच्या पतीने मारहाण केली. यामध्ये हवालदार जखमी झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुमगाव येथील अश्विनी संतोष पवार हिने पती संतोष हा मारहाण करत आहे. यासंदर्भात मला मदत करावी, अशी मागणी सोमवारी सकाळी नऊ वाजता सातारा पोलीस मुख्यालयात केली होती. यावरून कुडाळ पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्राराची खात्री करून पुढील कारवाई करावी, असे सातारा येथील पोलीस मुख्यालयातून आदेश मिळाले.
यानुसार पोलीस हवालदार पद्मसिंह घोरपडे घटनेच्या माहिती घेण्यासाठी गेले. तेव्हा पती-पत्नी यांच्यात भांडण सुरू होते. यावेळी भांडण सोडवायला गेलेल्या हवालदार पद्मसिंह घोरपडे यांना महिलेचा पती संतोष वेंकट पवार याने मारायला सुरलवात केली. यात घोरपडे जखमी झाले. त्याच्या विरोधात सरकारी गणवेशात असणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे, दमदाटी करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष पवार याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक महेश कदम तपास करत आहेत.