ऊस पळवापळवीचे धोरण घातक
By admin | Published: September 25, 2016 11:53 PM2016-09-25T23:53:57+5:302016-09-26T00:12:26+5:30
शंभूराज देसाई : साखर कारखान्याची ४६ वी वार्षिक सर्वसाधरण सभा
पाटण : ‘लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या उत्तर व दक्षिणेस खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले असून, त्यांचे देसाई कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या पळवापळवीचे धोरण व अतिक्रमण घातक आहे. ते थांबवावे लागणार आहे. त्यासाठी संचालक व ऊस उत्पादक सभासद यांच्यात समन्वय ठेवा,’ असे आवाहन देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
देसाई कारखान्याच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आ. देसाई म्हणाले, ‘चालू हंगामात राज्यातील ५० टक्के कारखाने ऊस टंचाईमुळे बंद राहण्याची भीती आहे. आघाडी शासनाने सहकारी कारखानदारी मोडीत काढून तेच कारखाने खासगी तत्त्वावर स्वत:च्या नातेवाईक व बगलबच्च्यांना चालविण्यास दिले आहेत. साखरेला चांगला भाव मिळावा म्हणून राज्यातील सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे. देसाई कारखान्याची ४५ वर्षे जुनी मशिनरी असून, यावर्षीच्या हंगामासाठी ७० टक्के नूतनीकरण केले जाणार आहे. यावर्षी पावणे दोन लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दिवसाला २००० टन उसाचे गाळप झाले पाहिजे आणि पावणेबारा साखर उतारा मिळाला पाहिजे.’
यावेळी रवींद्र भाकरे, बळवंत जानुगडे , बाळकृष्ण पवार यांचा चांगले ऊस उत्पादक म्हणून सत्कार करण्यात आला. सभेस रविराज देसाई, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील सर्व संचालक सभासद व शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एफआरपी देऊनसुद्धा कारखाना फायद्यात
‘गतवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देऊनसुद्धा देसाई कारखान्यास गत हंगामात साडेचार लाख रुपये नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा झाला आहे. बाकीच्या कारखान्यांनी एफआरपीचे १००० रुपये थकविले आहेत,’ असे देसाई यांनी सांगितले.
विमान बनविण्याऱ्या कॅप्टनचे कौतुक...
साळवे, ता. पाटण गावचे सुपुत्र कॅप्टन अमोल यादव यांनी विमान बनविले. त्याचा सत्कार झाला. यावेळी कॅप्टन यादव म्हणाले, ‘मी भारतात पहिले विमान बनविले. त्याचे राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आता २०० एकर जमीन व ३०० कोटी रुपये देऊन विमान बनविण्याचा कारखाना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
विरोधकांना कारखाना उभा करता आला नाही
‘विरोधकांनी देसाई कारखान्याच्या निवडणुकीत पडद्यामागून पॅनेल उभे करून राजकारण केले. त्यामुळे २५ लाखांचा खर्च कारखान्याला झाला आणि हीच मंडळी आता देसाई कारखान्याचा ऊस बाहेर घालण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्यांना स्वत:चा कारखाना अद्याप उभा करता आलेला नाही,’ अशी टीका आ. देसाई यांनी केली.