निवडणुकीपूर्वीच राजकीय व्यूहरचना!
By admin | Published: July 7, 2016 10:08 PM2016-07-07T22:08:20+5:302016-07-08T01:06:39+5:30
वडूज नगरपंचायत : अनेकांचे गुडघ्याला बाशिंग
वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्राथमिक प्रभाग सर्वेक्षणानंतर वडूज नगरीत संभाव्य प्रभाग रचना आपल्याला कशी फलदायी याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तर जाणकार व मुरब्बी नेत्यांकडून राजकीय व्यूहरचना आखली जात आहे.
सतरा प्रभागांत विखुरलेल्या वडूूज नगरपंचायतीला आता अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे दिग्गज नेतेमंडळींसह युवकांमध्ये या निवडणुकीसंदर्भात नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर शासकीय निधी आणि सर्व नागरी सुविधा तत्पर मिळणार असल्याने वडूजकर या निवडणुकीच्या स्वागताला सज्ज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रभाग रचनेबाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात येत असली तरी राजकारणात माहीर असलेल्या नेते मंडळींसह जुने-जाणकार सदस्यांनी यावर मात करीत सोयीचे राजकारण सुरू केले आहे. सध्या वडूज शहरात नमस्कारामुळे अनेक चमत्कार पाहावयास मिळत असून, मतदार राजाला अवाजवी महत्त्व प्राप्त होताना आढळून येत आहे. ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या बहुतांशी मंडळींनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. सतरा प्रभागांपैकी ९ महिला तर ८ पुरुषांसाठी राखीव असल्यामुळे मी नाहीतर आमच्या अर्धांगिणी आहेतच की? अशा आशयाची प्रचार यंत्रणा सुरू ठेवून काहींनी आघाडी घेतली आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग हजार
मतदानाच्या आतच...
प्रत्येक प्रभाग हजार मतदानाच्या आत असल्यामुळे नवीनलाही संधी मिळू शकते. यासाठी काही जाणकार व मुरब्बी नेत्यांकडून राजकीय व्यूहरचना आखली जात आहे. मात्र या निवडणुकीत साम-दाम-दंड या सर्वांचा वापर होणार असल्या कारणाने आपण कोठे कमी पडता कामा नये यासाठी सर्वपातळीवर इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत.