बामणवाडीत कोरोना लसीकरणात राजकीय श्रेयवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:33+5:302021-05-01T04:36:33+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने बामणवाडी येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सात वाड्यांसाठी ...
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने बामणवाडी येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सात वाड्यांसाठी आयोजित शिबिरात मर्यादित लस उपलब्ध झाल्याने लसीकरणासाठी गोंधळ निर्माण झाला. राजकीय श्रेयवाद आणि गटबाजीचे राजकारण काहीसे दिसून आल्याने लस घेण्यासाठी आलेल्या अनेक लोकांना लस न घेताच परत घरी जावे लागले.
वांग खोऱ्यातील कऱ्हाड तालुक्याचे शेवटचे टोक तारुखसह विभागातील बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी, शिबेवाडी, कारंडेवाडी, पवारवाडी आणि वानरवाडी या सात वाड्यांचा समावेश होतो. ग्रामीण डोंगरी विभागात या सात वाड्या असल्याने बामणवाडी येथे प्राथमिक शाळेत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. मर्यादित दोनशे लस उपलब्ध झाल्याने पंचेचाळीस वर्षांवरील सर्वांना लस देणे शक्य नव्हते. परिणामी वानरवाडी येथील पन्नास, तर बामणवाडी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या इतर सहा वाड्यांच्या निवडणूक तीन वाॅर्डनिहाय प्रत्येकी पन्नास लोकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातही जास्त वय असलेल्या लोकांना प्रथम प्राधान्य देण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यादी तयार करण्यात आली. मात्र, स्थानिक राजकीय गटामध्ये लसीकरणावरून गोंधळ निर्माण झाल्याने नियोजित यादीप्रमाणे सर्वांना लस देता आली नाही.
शिबिरास तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुप्रिया बनकर, आरोग्य सहाय्यक पंकज नलवडे, आरोग्यसेवक बालाजी ठेंगे, संतोष जाधव, युवराज शेवाळे, जमाल इनामदार, सेविका सुनीता पाटोळे, सुरेखा केदार, गट प्रवर्तक भाग्यश्री पाटील, आशा सेविका उपस्थित होत्या. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र व्यतिरिक्त शिबिराचे आयोजन करून कोरोना लसीकरण करता येत नाही. मात्र, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या कोळेवाडी आणि बामणवाडी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
(चौकट)
म्हणे, आधी राजकीय गटातील लोकांना लस...
स्थानिक एका राजकीय गटाच्या म्हणण्यानुसार एका विद्यमान पदाधिकाऱ्याच्या सूचनेनुसार शिबिर आयोजन करण्यात आले होते. मर्यादित लस असतानाही संबंधिताच्या राजकीय गटातील लोकांना प्रथम लस देण्यात आली, तर सकाळपासून लस घेण्यासाठी आलेल्या अन्य गटातील अनेकांना लस न घेताच घरी जावे लागल्याने लोकांमधून नाराजी व्यक्त होत होती.
(चौकट)
म्हणे, नेत्याच्या हस्ते उद्घाटन... मग लसीकरण
लस घेण्यासाठी सकाळपासून लोकांनी गर्दी केली होती. मात्र, दहा वाजले तरी लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. त्यानंतर एक विद्यमान पदाधिकारी आले. त्यांच्या उपस्थितीत फित कापून लसीकरणाला सुरुवात झाली. थोडा वेळ इकडे - तिकडे केल्यानंतर संबंधिताच्या गटातील काही कार्यकर्तेसोबत घेऊन फोटो सेशन झाले. मात्र, यावेळी अन्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतानाही त्यांना बोलावले नाही. परिणामी राजकारण आणि श्रेयवाद यातून स्पष्ट दिसून आला.