सत्तेच्या सारीपाटावर ‘आघाड्यां’चं राजकारण!
By admin | Published: November 5, 2016 11:16 PM2016-11-05T23:16:01+5:302016-11-06T00:41:42+5:30
पंचवार्षिक निवडणूक : प्रत्येक निवडणुकीला होतोय नव्या आघाड्यांचा उदय; कऱ्हाड पालिकेच्या राजकारणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
प्रमोद सुकरे --कऱ्हाड --राजकारणात सत्तेच्या सारीपाटावर कोण कधी ‘आघाडी’ घेईल? हे सांगता येत नाही. बुद्धीबळातील खेळाप्रमाणे राजकारणात कोण कधी कोणती ‘चाल’ खेळेल? हेही कळत नाही. कऱ्हाडच्या राजकारणात आपल्याला ‘आघाडी’ घेता यावी म्हणून नगरपालिकेच्या सारीपाटावर आजवर अनेक ‘आघाड्या’ उदयाला आल्या. त्यांच्यात बिघाड्या झाल्या तर काही इतिहासजमा झाल्या. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ‘आघाड्या’ अन् ‘आघाड्यां’पाठीमागचं राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे, हे मात्र खर!
कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या कऱ्हाडला मोठा इतिहास आहे. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसाबरोबर राजकीय वारसाही मोठा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी कऱ्हाड अन् गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची कर्मभूमीही कऱ्हाडच! दरम्यानच्या काळात अनेक मातब्बर नेत्यांनी येथे आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे कऱ्हाडच्या राजकारणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कऱ्हाड पालिकेच्या स्थापनेनंतर आजवर अनेकांनी या शहराचे नगराध्यक्षपद भूषविले आहे; पण दिवंगत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी शहराचे सलग चाळीस वर्षे नगराध्यक्षपद भूषवून निर्माण केलेला वेगळा इतिहास ‘गिनीज बुक’मध्ये जाऊन पोहोचला आहे. तो कधीही न विसरता येणारा आहे. त्यांच्या काळात म्हणे माणसं निवडणुकीला उभे राहण्यापूर्वीही पी. डी. पाटील यांना भेटायची अन् निवडून आल्यावरही पहिल्यांदा त्यांनाच भेटायला यायची.
पण बदल हा तर निसर्गाचा नियम आहे. सन १९९६ च्या सुमारास डॉ. द. शि. एरम यांनी कऱ्हाडच्या राजकारणात लक्ष घालीत पालिका निवडणुकीत ‘लक्ष’केंद्रित केले. त्यांनी ‘नगर विकास आघाडी’ स्थापन केली अन् कऱ्हाडात आघाड्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल; पण या ‘आघाडी’ला अपवाद वगळता कऱ्हाडच्या राजकारणात ‘आघाडी’ घेता आली नाही. काळाच्या ओघात ही ‘आघाडी’ इतिहास जमाही झाली.
ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे नेतृत्व मानणारे जयवंतराव जाधव सन १९९८ ते २००१ मध्ये कऱ्हाडचे नगराध्यक्ष होते. त्याकाळात जाधव परिवाराची शहरात राजकीय पतही वाढीस लागली. अशा परिस्थितीत पालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच जयवंत जाधव यांची हत्या झाली. अन् त्यानंतरच्या निवडणुकीत जाधव परिवाराच्या पुढाकारातून शहरात ‘जनशक्ती’ आघाडी उदयास आली. ‘जनशक्ती’ला शह देण्यासाठी पी. डी. पाटील व अर्बन गटाने ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून टक्कर दिली. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. पुलाखालून बरेच पाणी गेले. अन् सन २००६ रोजी पी. डी. पाटील यांच्या वासरदारांनी ‘लोकशाही’ आघाडीची स्थापना केली. अन् तेव्हापासून कऱ्हाडात ‘लोकशाही विरुद्ध जनशक्ती’ असा संघर्ष पाहायला मिळू लागला आहे.
कऱ्हाड पालिकेचं राजकारण नजीकच्या मलकापुरात राहणाऱ्या एका कार्यकर्त्याला खुणावू लागले. सन २००६ च्या निवडणुकीत अनपेक्षितपणे तीन अपक्ष उमेदवार निवडून आले. अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे सुरू झाले. तेव्हा गुलालात भरलेले हे अपक्ष समर्थकांसह कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवर दिसले. अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या. छुप्या पद्धतीने कऱ्हाडच्या राजकारणात प्रवेश करणाऱ्या भोसलेंनी ‘यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडी’ची स्थापना केल्याची घोषणा केली. अन् कऱ्हाडच्या राजकारणात आणखी एका आघाडीची भर पडली. कालपरवापर्यंत पालिकेच्या राजकारणात कागदावर का होईना अस्तित्वात असणारी ही ‘कृष्णा’ आघाडी सध्या कऱ्हाडच्या निवडणुकीत आघाडीचे नेते सक्रिय असतानाही यंदाच्या निवडणुकीतून गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळतेय, हे विशेष!
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना गतवेळी कऱ्हाड पालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी जनशक्ती आघाडीच्या काही तांत्रिक बाबी अपूर्ण असल्याने भोसलेंच्या ‘कृष्णा’ विकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री चव्हाण समर्थक आघाडीला सत्तेच्या चाव्या हाती घेता आल्या नाहीत. दरम्यान, याच निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले समर्थक राजेंद्र यादव ऐनवेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फारकत घेत बाजूला गेले आणि त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण शहर विकास आघाडी’ स्थापन केली; पण नोंदणीसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता त्यांनीही लोकशाही आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविली आणि बाळासाहेबांच्या विजयाला यादवांची झालर लागली. मात्र, आज पाच वर्षांनंतर यादवांची ही आघाडीही या निवडणुकीत ‘जनशक्तीत’ पुन्हा विलीन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कऱ्हाड शहराच्या राजकारणात आपला जम बसवू पाहणारे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी यंदा ‘कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीची’ नोंदणी केली आहे. त्या माध्यमातून उमेदवार उभे करण्याची खेळी प्रथमच केली आहे खरी; पण त्यांचा हा खेळ ‘कमळा’च्या पाकळ्यात गुंतल्याचे दिसत आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी नव्या आघाड्या जन्माला घालण्याचा प्रयत्न केला; पण एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता त्यांच बारसं मात्र झालं नाही.
राजकारणात कोण कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे मतभिन्नता झाली की नवी आघाडी जन्माला येत गेली. यंदाच्या निवडणुकीतही तीन आघाड्या प्रत्यक्ष रिंगणात उतरल्या आहेत; पण त्यातील निकालात कोण ‘आघाडी’ घेणार त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
‘पतंग’ उडविण्याचा अनेकांचा विचार..
कऱ्हाड पालिकेच्या राजकारणात आजवर पक्षीय चिन्ह कधीच रूचल्याचे पाहायला मिळाले आहे. तरीदेखील यंदा राज्यात आणि देशात ‘कमळ’ फुललेल्या भाजपने कऱ्हाडातही ‘कमळा’च्या काही पाकळ्या सापडताहेत का हे पाहण्याचे निश्चित केले. भाजपने कमळाचे चिन्ह बाहेर काढल्याने ‘लोकशाही’तील ‘घड्याळा’चे काटे पुढे सरकविण्यासाठी ‘जनशक्ती’चा ‘हात’ सरसावेल, असे वाटत होते. पण त्यातलं काहीच झालं नाही. मनसेचे ‘इंजिन’ही दुसऱ्याच्या दारात जाऊन उभे राहिले. शिवसेनेने जिकिरीने ‘शिवधनुष्य’ उचलले खरे पण त्यांचे बाण काही ठराविक प्रभागांतच जाऊन पोहोचले. काहीजण ‘पतंग’ उडविण्याचाही विचार करत आहेत; पण त्यांना अजून कऱ्हाडच्या राजकारणातलं वारं समजलेलं दिसत नाही.