‘कृष्णा’ कारखान्याचे राजकारण पुन्हा एकदा पेटले!
By Admin | Published: June 29, 2016 10:15 PM2016-06-29T22:15:21+5:302016-06-29T23:55:49+5:30
कार्यक्षेत्रात चर्चेला ऊत : चौकशीच्या आदेशानंतर माजी अध्यक्षांनी केले सत्ताधाऱ्यांवर प्रत्यारोप --‘संस्थापक’च्या संचालिका देसार्इंचे पद रद्द
सभासदांचे लक्ष वळविण्याचा फार्स --अविनाश मोहिते : सहकार खात्याच्या चौकशीला सामोरे जाऊ
कऱ्हाड : ‘गेल्या वर्षभरात कृष्णा सहकारी साखर कारखान्यात गलथान कारभार सुरू आहे. राज्याच्या ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य व कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांनी एफआरपी पेक्षा जास्त दर देण्यास सरकारद्वारे मनाई केली आहे. वर्षभरात कारखान्याची रिकव्हरी अर्धा टक्क्याने घटली आहे. याउलट तालुक्यातील एका खासगी कारखान्याची रिकव्हरी तब्बल एक टक्का कशी काय वाढली आहे? अशा अनेक प्रश्नांपासून तालुक्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काही सभासदांना पुढे करून सहकार खात्यामार्फत चौकशी करण्याचा फार्स केला जात आहे,’ अशी टीका कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केली. कऱ्हाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनिवाश मोहिते बोलत होते. यावेळी माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी संचालक पांडुरंग पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहिते म्हणाले, ‘कृष्णा सहकारी साखर कारखान्यात १९८७ पासून सतत कलम ७८, कलम ८३ व कलम ८८ अन्वये कुरघोड्या करण्यात आल्या आहेत. मात्र या राजकीय तक्रारींच्या चौकशीतून काही निष्पन्न झाले नव्हते. सन २०१० ते १५ याकाळात कारखान्याच्या ५६ वर्षांच्या कारकिर्दीचे अवलोकन केले असता, तक्रारी करण्याइतपत खूप मुद्दे वाचण्यात आणि पाहण्यात आले. परंतु कारखान्याचा कारभार आणि सभासदांचे हित याला प्राधान्य दिले. कोणावर तक्रारी करण्यात किंवा तक्रारदारांना पाठीशी घालण्यात आम्ही वेळ घालविला नाही. मात्र, आमच्या विरुद्ध काही जणांनी तक्रारी केल्या. त्याची चौकशी त्या-त्या वेळी पूर्ण करण्यात आली. खरंतर ज्या मुद्द्याची चौकशी पूर्ण झाली आहे. त्या मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे. आम्ही सत्तेत असताना सभासदांच्या मुलांना कारखान्यात रोजगार उपलब्ध करून दिला. देशी दारू प्रकल्प व डिस्टीलरीचा नफा २४ रुपयांपर्यंत वाढविला. (प्रतिनिधी)
संभ्रम निर्माण केला तरी सभासदांना वस्तुस्थिती माहीत...
उपसा जलसिंचन योजनांना १६ तास अखंडित वीजपुरवठा दिला. कृषी महाविद्यालयाची इमारत उभी करण्याचा प्रयत्न केला. कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्णत्वास नेले. कारखान्याची गाळप क्षमता १०० टक्के वापरता येते हे सिद्ध केले. आणि याच मुद्द्याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातून काही मोठे निष्पन्न होईल, असा संभम्र निर्माण केला असला तरी सभासदांना वस्तुस्थिती माहीत आहे. या संपूर्ण चौकशीला आम्ही कायदेशीररीत्या सामोरे जाणार आहोत.
प्रत्यक्षात कारखान्यात १३ लाख पोती तयार असल्याचे उपलब्ध रेकॉर्डवरून दिसते. मग वरची पोती गेली कोठे, असा प्रश्न पडला आहे. अशा सर्व प्रश्नांपासून सभासदांचे लक्ष वळविण्यासाठी कोणाला तरी पुढे करून चौकशा लावण्याचे काम भोसले करीत आहेत.’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
‘संस्थापक’च्या संचालिका देसार्इंचे पद रद्द
प्रादेशिक संचालकांचा आदेश : अविनाश मोहितेंना आणखी एक धक्का
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील विरोधी संस्थापक पॅनेलच्या विद्यमान संचालिका डॉ. उमा अजित देसाई यांचे संचालकपद रद्द करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी बजावले आहेत. त्यामुळे अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला आणखी एक धक्का बसला असल्याची चर्चा असून, कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कृष्णा कारखान्याच्या गतवर्षी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेलचे अवघे सहा उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये महिला राखीव गटातून काले, ता. कऱ्हाड येथील डॉ. उमा अजित देसाई या निवडून आल्या होत्या. मात्र सहकारी संस्थेची ५ लाख रुपयांहून अधिक थकबाकी थकविल्याने उमा देसाई यांच्यावर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी ही कारवाई केली आहे.
प्रादेशिक साखर संचालकांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, उमा देसाई यांनी कृष्णा महिला नागरी पतसंस्थेतून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांनी या कर्जाचे हप्ते न भरल्याने कर्जखाते थकित झाले होते. त्यामुळे पतसंस्थेने थकित कर्जवसुलीसाठी सहकार उपनिंबधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. यानुसार या प्रकरणाची शहानिशा करून उपनिबंधकांनी २०१३ मध्ये उमा देसाई यांना दोषी ठरवून कर्ज रक्कम व व्याजासह ५ लाख २८ हजार २४४ रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता; पण या आदेशालाही देसार्इंनी हरताळ फासला.
सहकारी संस्थेच्या थकबाकीदार असूनही कारखान्याचे संचालकपद बेकायदेशीरपणे भूषविणाऱ्या देसाई यांच्या विरोधात कारखान्याचे सभासद निवास संभाजी मोहिते रा. रेठरे बुद्रुक यांनी साखर सहसंचालकांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर देसाई या सहकारी संस्थेच्या थकबाकीदार असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)