राजकारण राहूदे जनतेची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:25 AM2021-06-10T04:25:59+5:302021-06-10T04:25:59+5:30

सातारा : ‘सर्वसामान्य सातारकर आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शहरासह ...

Politics Rahude do the work of the people | राजकारण राहूदे जनतेची कामे करा

राजकारण राहूदे जनतेची कामे करा

Next

सातारा : ‘सर्वसामान्य सातारकर आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शहरासह हद्दवाढीतील प्रस्तावित कामे प्राधान्याने मार्गी लावा. त्यात कोणतीही हयगय चालणार नाही. शिवाय सातारा विकास आघाडीत सुरू असलेले गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने एकदिलाने काम करावे,’ अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आघाडीच्या नगरसेवकांची कानउघडणी केली.

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली पालिकेची निवडणूक, कोरोनामुळे लांबलेली सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची बैठक व शहरात दोन दिवस सुरू असलेला उदयनराजेंचा दौरा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी दुपारी जलमंदिर येथे पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद निशांत पाटील, सभागृह नेत्या स्मिता घोडके, सांस्कृतिक व क्रीडा विभागप्रमुख सुजाता राजेमहाडिक, आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट व आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.

सातारा विकास आघाडीत सुरू असलेल्या राजकारणाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सातारा शहरातील विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पालिकेत येणाऱ्या सर्वसामान्यांची कामे अग्रक्रमाने झालीच पाहिजेत. आघाडीमध्ये दोन-तीन गट पडल्याचे जाणवत आहे. येत्या पालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडी एकसंघ दिसायला हवी. साविआने पाच वर्षांपूर्वी जो वचननामा दिला होता, त्यातील नव्वद टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हीच कामे घेऊन आपण लोकांमध्ये जायचे आहे. त्यासाठी गट-तट बाजूला ठेऊन एकदिलाने काम करावे.

प्रलंबित सर्वसाधारण सभा व रखडलेल्या विकासकामांच्या प्रस्तावावर सह्या होत नसल्याने कामाचा निपटारा होत नाही, अशी तक्रार यावेळी स्मिता घोडके यांनी केली. तेव्हा उदयनराजे यांनी थेट नगराध्यक्ष माधवी कदम यांनाच विचारणा केली. विकासकामांचे प्रस्ताव हे माझ्या परस्परच अंतिम होतात. शिवाय कामांचे प्रस्ताव येताना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नसतात, सूचक व अनुमोदक यांच्या सह्या नसताना त्यावर सही करताना अडचण होत असल्याचे नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सांगितले. या बैठकीला नगरसेवक वसंत लेवे, संगीता आवळे, सविता फाळके, विशाल जाधव अनुपस्थित होते.

(चौकट)

आम्हाला ग्राह्यचं धरलं जात नाही

प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या साविआच्या बैठकीत नगराध्यक्ष माधवी कदम यांनी खासदार उदयनराजेंपुढे आपली कैफियत मांडली. आजवर कोणती कामे अडवली, कोणत्या फायलींवर सही केली नाही, हे नगरसेवकांनी स्पष्ट करावे, असे त्या म्हणाल्या. मात्र, एकाही नगरसेवकाने साधा शब्द काढला नाही. आम्हाला आता ग्राह्यचं धरलं जात नाही. अनेक कामे मुख्याधिकारीच ठरवतात. त्याची कल्पनाही दिली जात नाही. मग आम्ही कामे कशी करायची? असा प्रश्न नगराध्यक्षांनी उपस्थित केला. यावर उदयनराजेंनी हा प्रकार चुकीचा असून, प्रत्येक कामाची माहिती नगराध्यक्ष, संबंधित नगरसेवक यांना दिलीच पाहिजे, अशा सूचना केल्या.

(चौकट)

अभियंत्यांची बदली करा

या बैठकीत राज्य संवर्गातील इंजिनिअर काम करत नसल्याची तक्रार करण्यात आली. काही अभियंते विरोधकांची कामे करतात आणि प्रत्यक्षात कामाच्या निमित्ताने नगरसेवकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात, अशी थेट तक्रार उदयनराजे समर्थक अशोक घोरपडे यांनी केली. या अभियंत्यांची तत्काळ बदली करण्याची सूचना उदयनराजे यांनी केली.

(चौकट)

अपेक्षापूर्तीचे आव्हान...

पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवक आता ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. स्वत: उदयनराजे भोसले यांनी बैठकांचा धडाका सुरू केला असून, हद्दवाढीत आलेल्या भागाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, असे असले तरी शहरातील भुयारी गटार योजना, महिला स्वच्छतागृह, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण असे अनेक प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे. कास धरणाचे काम जवळपास ९० टक्के झाले असले तरी ते पूर्णत्वास येण्यासाठी आणखी किती कालावधी जाणार, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सातारा विकास आघाडीपुढे आहे.

फोटो : सातारा पालिका

Web Title: Politics Rahude do the work of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.