साताऱ्यातील जनता बँकेसाठी उद्या मतदान, १९ जण निवडणूक रिंगणात
By नितीन काळेल | Published: June 16, 2023 04:00 PM2023-06-16T16:00:07+5:302023-06-16T16:00:32+5:30
२१ हजार मतदार; रविवारी मतमोजणी
सातारा : सातारा शहरवासीयांची अर्थवाहिनी असणाऱ्या जनता सहकारी बॅंक निवडणुकीतील १७ जागांसाठी शनिवारी ३४ केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. तर या निवडणुकीतील चार जागा बिनविरोध झाल्या असून आता १९ जणांचे नशिब पणाला लागले आहे.
जनता सहकारी बँकेचीनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वसाधारणमधून १६ जणांना निवडून द्यायचे आहे. महिला प्रवर्ग २, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास गट १ आणि ओबीसी गटातूनही एका संचालकाला निवडून द्यायचे आहे. यामधील विशेष मागास गटात एकच अर्ज राहिला होता. त्यामुळे बाळासाहेब गोसावी यांची बिनविराेध निवड झाली आहे.
तर माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अनेक घडामोडी घडून आल्या. त्यामुळे महिलांमधीलही दोन जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये सुजाता राजेमहाडिक आणि चेतना माजगावकर यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती-जमाती गटातूनही प्रकाश बडेकर यांनी माघार घेतल्याने विजय बडेकर यांची बिनविराेध निवड झालेली आहे.
आता १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वसाधारणमधील १६ जागा आहेत. यासाठी १७ जणांत लढत आहे. आनंदराव कणसे, विनोद कुलकर्णी, अक्षय गवळी, चंद्रशेखर घोडके, जयेंद्र चव्हाण, मच्छिंद्र जगदाळे, वजीर नदाफ, शकील बागवान, अविनाश बाचल, चंद्रकांत बेबले, जयवंत भोसले, रवींद्र माने, अमोल मोहिते, वसंत लेवे, नारायण लोहार, रामचंद्र साठे आणि माधव सारडा हे रिंगणात आहेत. ओबीसी प्रवर्गात चारुदत्त सपकाळ आणि अशोक माेने यांच्यात लढत होणार आहे.बँकेच्या १७ जागांसाठी निवडणूक रिंगणात १९ जण राहिले आहेत. शनिवार, दि. १७ जूनला सकाळी ८ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे.
सध्या जनता बँकेवर भागधारक पॅनलची सत्ता आहे. तर या निवडणुकीत आतापर्यंत भागधारक पॅनलचेच चाैघे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. हा पॅनल सर्व जागा लढवत आहे. आता १७ जागांसाठी मतदान होणार असले तरी सत्ता ही भागधारक पॅनलचीच राहणार आहे.
२१ हजार मतदार; रविवारी मतमोजणी...
बॅंकेसाठी शनिवारी जिल्ह्यातील ३४ केंद्रावर मतदान होणार आहे. यातील २५ केंद्रे ही शहर आणि सातारा तालुक्यात आहेत. तर ९ केंद्रे वाई, खंडाळा, भुईंज, कोरेगाव, रहिमतपूर, कऱ्हाड आदी ठिकाणी आहेत. बॅंकेचे मतदार २१ हजार ८१ आहेत. शनिवारी मतदान झाल्यानंतर रविवारी सकाळी आठपासून साताऱ्यातील जरंडेश्वर नाका येथील नागरी बॅंक असोसिएनच्या कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांनी दिली.