टँकरनं पाणी देऊन जगवतोय डाळींबाची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2015 08:22 PM2015-08-31T20:22:29+5:302015-08-31T23:39:34+5:30
बळीराजाला अन्नदाता म्हणून ओळखलं जातं. आयुष्यभर काबाड कष्ट उपसणंच ज्याला ठाऊक... वर्षभर वणवण करून
काळ्याआईची सेवा करूनही जेव्हा थोडंच उत्पन्न मिळतं, तेव्हाही त्याचे पाय जमिनीवरच असतात. किंवा भरमसाठ पीक आलं म्हणून उन्मात करत नाही. हार माणणं त्यांच्या रक्तातच नाही. त्यामुळे दुधेबावी परिसरातील बळीराजा झगडतोय दुष्काळसदृश परिस्थितीशी. वरुणराजानं पाठ फिरविली म्हणून शेती सोडून कशी चालेल. त्यामुळे येथील काही शेतकरी चक्क टँकरचं पाणी आणून पिकं जगविण्यासाठी धडपड करत आहेत.
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील दुधेबावी, वडले, भाडकी खुर्द, भाडळी बुद्रुक, सासकल, तिरकवाडी, नाईकबोमवाडी, मिरढे, शेरेशिंदेवाडी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवायला लागली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात जरा चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र, संपूर्ण जून, जुलै, आॅगस्ट महिना कोरडाच गेला. आता केवळ एका सप्टेंबर महिन्यावर आशा उरल्या आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. तसेच फळबागांही मोठ्या प्रमाणात लावल्याने कमी पाण्यावर पीक कसे जगवायचे, हा प्रश्न बळीराजाला सतावत आहे. त्यावर मात करण्यासठी काही शेतकरी पाणी विकत आणून पिकांना देत आहेत.
डाळिंबाच्या अनेक बागा मध्यावस्थेत आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल आहे. असेच शेतकरी सातशे ते हजार रुपये मोजून सहा हजार लिटर क्षमतेचा टँकर पाणी आणून झाडांना आणून घालत आहेत. फळांचा आकार मध्यम अवस्थेत असल्याने बाग सोडूनही देता येत नाही. काही शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून डाळिंब पिकासाठी पाणी देत आहेत. त्यातच तेल्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तावला आहे.
डाळिंबासाठी सुमारे पाच-सहा दिवसांतून एकदा पाणी घ्यावे लागत आहे. हे पीक सुमारे सहा महिने कालावधीचे असते. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर आहे त्यांचा खर्च वाचत असून, ते लांब-लांबून पाणी आणून पिकांना देत आहेत.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे...
पाऊस पडला नसल्याने आम्ही चिंतेत आहोत. सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक चिंता सतावत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते पाणी विकत आणून पिकांना देत आहेत; मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कर्जे काढून रोपे आणली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गरज आहे, अशी मागणी दुधेबावी सोसायटीचे संचालक शिवाजी सोनवलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
नीलेश सोनवलकर