डाळिंबाचे दर कोसळले; शेतकरी कर्जबाजारी
By admin | Published: January 1, 2016 10:25 PM2016-01-01T22:25:00+5:302016-01-02T08:29:26+5:30
फलटण तालुका : विकत पाणी घेऊन जगविल्या होत्या बागा
नीलेश सोनवलकर --दुधेबावी -दिवाळीपासून डाळिंबांचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. फलटण तालुक्यात तर विकत पाणी घेऊन बागा जगविल्या होत्या. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
दिवाळीपूर्वी १६० ते १८० रुपये किलो दराने डाळिंब विकले जात होते. परंतु दिवाळीपासून सर्व व्यापारी सणासाठी गावी गेले होते. परिणामी सर्व बाजार ठप्प झाला होता. त्यानंतर चेन्नई (तामिळनाडू) येथे मुसळधार पाऊस झाल्याने तेथे जाणारा माल पूर्णत: थांबला. त्यामुळे डाळिंबाच्या दरावर मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीला डाळिंबाचे दर पडल्याने सुमारे ३० ते ४० रुपयापर्यंत खाली आले आहेत. त्यामध्ये एका कॅरेटमागे ६० रुपये आडत, हमालीचे घेतले जात आहेत. तसेच मालवाहतूक करणारे एका कॅरेटमागे फलटण ते मुंबईसाठी ७० रुपये घेतात. डाळिंबांची प्रतवारी करण्यासाठी कामगार ठेवावे लागतात. त्यांना ४०० रुपये दिवसाची हजेरी द्यावी लागते. तसेच एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब बसतात. त्यामुळे दर पडला तर सर्व खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हातामध्ये एकदम थोडी रक्कम राहत आहे. बाग पोसताना शेतकऱ्यांना औषधाचा व मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. दुष्काळी भागात विकत पाणी घेऊन बागांना द्यावे लागत आहे. आता डाळिंबांचे दर पडल्याने व्यापारीही बागांमध्ये येत नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील बाजार समितीमध्ये अधिकृतरीत्या काम करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन तो मुंबई, पुणे तसेच इतर राज्यात व देशात पाठवितात. तसेच हा माल बाहेर देशात पाठविला की तो एक्स्पोर्ट केला असे म्हणतात. परंतु एक्स्पोर्ट करण्यासाठीची जी फळे असतात ती बागेतील सर्वोत्कृष्ट असतात. त्या फळांचा दरही मोठ्या प्रमाणात असतो. एक्स्पोर्ट होणारा माल हा मोजक्या शेतकऱ्यांकडे असतो.
डाळिंबांचे दर पडल्याने शेतकरी संकटात आला असून, काही शेतकऱ्यांचा तर बागेसाठी करण्यात आलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे डाळिंब बागधारक शेतकरी नाराजीच्या छायेत आहेत.
- प्रशांत भीवरकर, धूळदेव
डाळिंब पिकासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी फळपीक घेणे बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
- अजित आडके, ग्रामस्थ दुधेबावी