गरिबांचे बदामही महागले

By admin | Published: August 26, 2016 10:43 PM2016-08-26T22:43:28+5:302016-08-26T23:15:27+5:30

शेंगदाणेही आवाक्याबाहेर : कूट अन् लाडू स्वयंपाक घरातून हद्दपार

Poor almonds too expensive | गरिबांचे बदामही महागले

गरिबांचे बदामही महागले

Next

सातारा : गरिबांचे बदाम म्हणून ओळख असणाऱ्या शेंगदाण्यांनी तब्बल वीस रुपयांची उडी मारल्याने सामान्यांची तारांबळ उडवली आहे. शेंगदाण्याचे दर एका महिन्यात वीस रुपयांनी वाढल्यामुळे सध्या स्वयंपाक घरातून कूट आणि शेंगदाण्याचे लाडू काही दिवसांसाठी हद्दपार झाले आहेत.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्यांचे उत्पन्न होत असले तरीही सेलम आणि कर्नाटक भागांतून येणाऱ्या शेंगदाण्याला महाराष्ट्रात चांगला भाव मिळतो. गेल्या काही दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेंगदाण्यांचे नुकसान झाले आहे. काही साठवणूक केंद्रात आर्दतेमुळे शेंगदाण्यांना कोंब आले आहेत. सर्वत्रच पावसाचे थैमान वाढल्यामुळे शेंगदाण्यांच्या वाहतुकीवर मर्यादा आल्याने सध्या बाजारपेठेत शेंगदाण्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे किमतीत किलो मागे वीस रुपयांची वाढ झाली आहे.
साताऱ्यात किराणा दुकानांमधून घुंगरू जातीच्या शेंगदाण्याला वाढती मागणी आहे. आकाराला लहान आणि तेलयुक्त असलेला हा शेंगदाणा परराज्यातून महाराष्ट्रात येतो.
पातळ साल असल्यामुळे हा शेंगदाणा लवकर भाजला जातो, त्यामुळे गृहिणी या शेंगदाण्याला विशेष पसंती देतात. ९० रुपये किलो असलेला घुंगरू आता ११० रुपये किलोने बाजारात भाव खात आहे. त्यामुळे घुंगरू सध्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
श्रावणात उपवास असल्यामुळे खिचडी आणि वरीच्या तांदळावर ब्रेक लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, दरवाढ कमी झाल्यानंतर पुन्हा शेंगदाणे खाऊच की, अशा सकारात्मक प्रतिक्रिया महिला वर्गातून येत आहेत. (प्रतिनिधी)


पौष्टिक लाडूंवर काही दिवसांची बंदी
वजन वाढविण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतू उत्तम असल्याचे मानले जाते. त्यामुळे अनेकजण या ऋतूंमध्ये पौष्टिक लाडू खाण्यावर भर देतात. शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून तयार करण्यात आलेला शेंगदाण्याचा लाडू हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो. अनेक सामान्य घरांमध्ये मुलींना रोज सकाळी हे लाडू दिले जातात; पण शेंगदाण्याच्या किमती वाढल्याने दोन ऐवजी एकच लाडू देऊन लाडू पुरविण्याकडे गृहिणींचा कल दिसत आहे. काहींनी शेंगदाणे, खजूर, गूळ आणि खोबरे घालून लाडू तयार करून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केलाय. तर काही घरांमध्ये दर कमी होईपर्यंत पौष्टिक शेंगदाणा लाडूंवर काही दिवसांची बंदी आणण्यात आली आहे.

Web Title: Poor almonds too expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.