पाटणमधील ब्रिटीशकालीन पुलाची खड्ड्यांमुळे दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:30+5:302021-06-10T04:26:30+5:30
रामापूर : कऱ्हाड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर पाटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील केरा नदीवर असलेल्या ब्रिटीशकालीन पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली ...
रामापूर : कऱ्हाड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर पाटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील केरा नदीवर असलेल्या ब्रिटीशकालीन पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडून पाण्याची डबकी साचल्याने वाहनचालकांना वाट काढत खड्ड्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींना हे खड्डे दिसत नाहीत का? असा संतप्त प्रश्न वाहनचालकांसह स्थानिकांमधून विचारला जात आहे.
या ब्रिटीशकालीन पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम करण्यात आले होते. या पुलाशेजारी नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, याही पुलाचे काम अर्धवट राहिल्याने तोही वापराविना तसाच आहे.
कऱ्हाड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील या पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. कोकणात जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज या मार्गावरून शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक वाढली असताना, पुलावरील रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. सध्या या पुलावरील रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे बिकट झाली आहे. या पुलावरील खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघातही झाले आहेत. येेथे एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्नही विचारला जात आहे. बांधकाम विभाग अथवा लोकप्रतिनिधींनी या पुलाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांमधून होत आहे.
०९ रामापूर
पाटण शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या ब्रिटीशकालीन पुलाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.