माळीखोरा-पळशी रस्त्याची चार वर्षांपासून दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:21+5:302021-05-25T04:43:21+5:30
पळशी : माण तालुक्यातील पळशी ते माळीखोरा रस्त्याची गेल्या चार वर्षांपासून दुरवस्था झाली असून, दरवर्षी वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक ...
पळशी : माण तालुक्यातील पळशी ते माळीखोरा रस्त्याची गेल्या चार वर्षांपासून दुरवस्था झाली असून, दरवर्षी वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी किमान या मार्गावर मुरुमीकरण तरी करावे, अशी मागणी माळीखोरा ग्रामस्थांतून होत आहे.
या मार्गावरील गुरवकी नजीकच्या यादववस्ती जवळील ओढ्यात रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. वस्तीनजीकच तळे असल्याने पावसाळ्यात तळ्यातील पाणी पाझरून रस्त्यावर येते. त्यामुळे पावसाळ्यानंतरही बरेच महिने हा रस्ता येण्या-जाण्या योग्य होत नाही तर ऐन पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असते. या रस्यावरून चालणेही जिकिरीचे होते.
माळीखोरा परिसरातून रेशनिंगसाठी तसेच किराणा मालासाठी पळशीला दररोज ये-जा सुरू असते. याबरोबरच शालेय विद्यार्थीही दररोज जात असतात; पण सर्व रस्ता चिखलमय असल्याने दुचाकी या ओढ्यातून पुढे घेऊन जाता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याचदा पळशीला जायचे असल्यास महादेव मार्गे जवळपास पाच किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागत असल्याने ग्रामस्थांचे वेळ व इंधन दोन्ही वाया जात आहे. येथील गुरवकी परिसरात अनेक शेतकऱ्यांचे शेत असून, त्या सर्व शेतकऱ्यांना याच मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे आवश्यक असणारी खते, बी-बियाणे तसेच शेतात पिकवलेल्या मालाची ने-आण करणे अत्यंत अवघड होऊन जात आहे. गत पावसाळ्यात याच ओढ्यात अनेकांच्या दुचाकी चिखलात रुतल्या तर बरेचजण चिखलात दुचाकी घसरल्याने जायबंदीही झाले. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी दरवर्षीच होत असते. पण प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट, अशी भूमिका करत असून, आता तरी प्रशासन गांधारीची भूमिका सोडून पावासाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
(चौकट)
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज..
माळीखोरा येथे विद्यमान सरपंच व एक महिला सदस्या राहत असून, तीन वर्षे पदभार घेतल्यापासून त्यांनाही दररोज याच मार्गाने निमूटपणे जावे लागत आहे. तेही या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
कोट...
माळीखोरा-पळशी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात सर्व रस्ता चिखलमय होतो. किमान मुरुमीकरण तरी करावे
-दगडू यादव, शेतकरी माळीखोरा
फोटो२४पळशी
माण तालुक्यातील माळीखोरा-पळशी रस्त्याची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यापूर्वी किमान मुरुमीकरण तरी करावे, अशी मागणी होत आहे.