शिवारातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:05+5:302021-08-13T04:44:05+5:30
कऱ्हाड : गत महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले ...
कऱ्हाड : गत महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून शेतक-यांसह ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दोन ते तीन महिन्यांनी साखर कारखाने सुरू होणार असून ऊस वाहतुकीवेळी मोठी अडचण होणार आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन ट्रॅक्टर मालकांसह शेतक-यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतींना पाणंद रस्त्यांच्या डागडुजीसाठी त्वरित निधी देणे गरजेचे आहे.
राजमाता गटाने जपली सामाजिक बांधीलकी
कऱ्हाड : रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील राजमाता महिला स्वयंसाहाय्यता महिला समूहाने पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामस्थ तसेच मंडळांच्यावतीनेही जीवनावश्यक वस्तू, कपडे, भांडी, धान्य स्वरूपात मदत देऊ केली आहे. जमलेल्या वस्तू महिला समूहाच्यावतीने स्वखर्चाने टेम्पोद्वारे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी सरपंच सुवर्णा कापूरकर, महिला अध्यक्षा वृषाली कावरे, स्वाती दमामे, दीपाली डोईफोडे, सुजाता गायकवाड, सीमा नावडकर, सविता साळुंखे, शुभांगी वेदपाठक, माधुरी कावरे, पिनू कावरे, बबन घोडके, महेश डोईफोडे आदी उपस्थित होते.
येळगावच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात
कऱ्हाड : येळगाव, ता. कऱ्हाड येथील पूरग्रस्तांना पंचायत समितीचे सदस्य काशिनाथ कारंडे यांच्यावतीने ब्लँकेट व चटई वाटप करण्यात आले. कहाड दक्षिणचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तसेच रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे अॅड. पाटील यांनी यावेळी केले. प्रा. धनाजी काटकर, श्यामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बी. एल. पाटील, पंचायत समिती सदस्य काशिनाथ कारंडे, सरपंच शालन मोहिते, उपसरपंच सचिन पाटील, सोसायटीचे अध्यक्ष के. एन. जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रा. राजेंद्र सुतार यांनी मानले.
तुळसण येथे रस्ते काँक्रिटीकरणास प्रारंभ
कऱ्हाड : तुळसण, ता. कऱ्हाड येथील बौद्ध वस्तीअंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण व नाले बांधकामाचा प्रारंभ सरपंच उषादेवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बौद्धवस्तीत लागणा-या गरजेच्या सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. यावेळी उपसरपंच राजश्री वीर, अॅड. आत्माराम पाटील, काकासाहेब माने, प्रमोद गावडे, ग्रामसेवक आशिष कांबळे, मुकुंद गावडे, समिर गोतपागर, आनंदा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. काँक्रिटीकरण झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. अॅड. आत्माराम पाटील यांनी स्वागत केले. काकासाहेब माने यांनी आभार मानले.