यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:53+5:302021-05-08T04:40:53+5:30
पेट्री : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ...
पेट्री : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या घाटातील होणारी वाहतूक अधिकाधिक धोकादायक बनत चालली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ लागला आहे. गुरुवारच्या मुसळधार पावसाने पंचवीस ते तीस फूट लांबीपर्यंतचे संरक्षक कठडे ढासळल्याने धोका निर्माण झाला आहे.
शहराच्या पश्चिमेस कास, बामणोली ही जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने या परिसरात फिरायला जाण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. यामुळे येथून सतत वर्षभर वाहतूक सुरू असते. तसेच कित्येक खासगी वाहने, अवजड मालाची वाहने, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले व नोकरदार वर्गाचीदेखील या परिसरातून सतत रहदारी असते. तसेच शनिवार, रविवार, उन्हाळी सुटीत तसेच जोडून सुटी आल्यास मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक कोरोना महामारीपूर्वी सुरू असते.
सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने या मार्गावर वाहनचालक दिसत नसले, तरी अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना या मार्गाने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात एकीकडे कोसळणारी दरड, तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेले संरक्षक कठडे अशा बिकट परिस्थितीत दाट धुक्यातून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो. यामुळे घाटातील दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी तत्काळ करण्यात यावीत, असे वाहनचालकांतून बोलले जात आहे.
बहुतांशी ठिकाणी साधारण दहा ते बारा ठिकाणी ढासळलेले कठडे व नादुरुस्त कठड्यांची दुरुस्ती जैसे थे आहे. यामुळे संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याची तसेच रात्रीच्यावेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर बसविण्याची, सूचना फलक लावण्याची मागणी वाहनचालकांतून जोर धरत आहे.
(चौकट)
घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठड्यांची झालेली दुरवस्था व ज्या ठिकाणी कठडेच गायब आहेत, अशा ठिकाणी कठड्यांची दुरुस्ती व नव्याने संरक्षक कठडे बांधण्यात यावेत. तसेच कोणतीही विपरित घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक स्थानिकांतून होत आहे.
०७पेट्री
फोटो कॅप्शन : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील संरक्षक कठडे मोठ्या प्रमाणावर ढासळून धोका निर्माण झाला आहे.
(छाया : सागर चव्हाण)