करहरमध्ये सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:55+5:302021-03-16T04:38:55+5:30
पाचगणी : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहरमध्ये सार्वजनिक शौचलायाचे पाणी तुंबून राहिल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायत मात्र हाताची घडी ...
पाचगणी : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहरमध्ये सार्वजनिक शौचलायाचे पाणी तुंबून राहिल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायत मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून निर्धास्त आहे.
करहर, (ता. जावळी) हे मुख्य बाजारपेठेचे गाव असल्याने परिसरातील २५ ते ३० गावांचा नित्य संबंध या बाजारपेठेशी येत असतो. तसेच येथे प्रत्येक गुरुवारी आठवडा बाजार भरतो. त्यामुळे येथे शौचालय असणे आवश्यक होते. येथे मुख्य बाजारपेठेत एक सार्वजनिक शौचालय असून, ही नसल्यासारखे झाले आहे. त्याची स्वच्छता राखली जात नाही. बाहेरगावचे येणारे लोक त्याच शौचालयाचा वापर करीत असतात.
करहर ग्रामपंचायत मात्र त्याची निगा राखीत नाही. गुरुवारी बाजारासाठी येणाऱ्या व्यावसायिकांकडून मात्र बाजार व्यवसाय कर घेऊन त्यांना मात्र शौचालयाची सुविधा उपलब्ध कर देण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरत आहे, तर आज हे शौचालय दुर्गंधीच्या फेऱ्यात अडकले असून, ग्रामपंचायत मात्र व्यावसायिकांच्याकडून व्यवसाय कर घेऊनही त्यांना शौचालयाच्या सुविधेपासून वंचित ठेवत आहे.
चौकट :
महिला जातायत अनेक अडचणींना सामोरे..
या ठिकाणी पुरुषांसाठी शौचालय असून, नसल्यासारखे आहे तर महिलांसाठी बाजारपेठेत कोठेच महिला शौचालय नसल्याने या बाजारासाठी येणाऱ्या महिलांची अनेकदा कुचंबणा होत असते.
15पाचगणी
करहर (ता. जावळी) येथील सार्वजनिक शौचालय पाण्याने तुडुंब भरले आहे.