सालपे-लोणंद रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:04+5:302021-01-25T04:40:04+5:30
आदर्की: सातारा-पुणे रोडवरील सालपे ते लोणंद या पंधरा किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली ...
आदर्की: सातारा-पुणे रोडवरील सालपे ते लोणंद या पंधरा किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली असून वाहनांचे पार्ट निकामी होत आहेत तर वाहनधारकांचे कंबरडे मोडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सातारा-पुणे रोडवर सालपे-लोणंद दरम्यान कोपर्डे, तांबवे, आरडगाव फाटा, हिंगणगाव, सालपे आदी गावांतील लोक दुचाकीवरून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात; पण या रस्त्यावरून जाता-येताना घरातून व्यक्ती बाहेर गेल्यानंतर परत तंदुरुस्त येईलच याची खात्री घरातील लोकांना नसते. कारण रस्त्यावर डांबरच राहिले नाही फक्त खड्डे पडले आहेत.
खड्डे एक ते दीड फुटाचे असल्याने दुचाकी खड्ड्यात आपटून दुचाकीचे पार्ट निकामी होतात तर दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडत आहे. या रस्त्यावर अनेक वर्षे खड्डे बुजविले नसल्याने डांबर, खडी निघून गेल्याने फक्त माती राहिल्याने धुराळ्याचाही त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागतो. ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, ट्रेलरची वाहतूक वाढली होती. ती पर्यायी मार्ग शोधत दुसऱ्या रस्त्याने जातात. लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक कमी झाली आहे तर दररोज वाहतूक करणारे वाहनचालक वैतागून संताप व्यक्त करतात. संबंधित विभागाने खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
24आदर्की
फोटो -सालपे-लोणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.