पाण्याअभावी पिके पडली पिवळी
By admin | Published: March 8, 2017 11:31 PM2017-03-08T23:31:11+5:302017-03-08T23:31:11+5:30
कोरेगाव उत्तर : वसनेच्या पहिल्या टप्प्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी
वाठार स्टेशन : कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सध्या वाढत्या उन्हामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावत चालली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण झाल्याने या परिसरातील उसाची पिके पाण्याअभावी करपून जाऊ लागली आहेत. या पिकांना आठवड्यात पाणी उपलब्ध झाले नाही तर या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासाठी वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात हक्काची कोणतीच पाणी योजना नसल्याने या भागातील शेतकरी ग्रामस्थांना पाणीटंचाईशी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार या भागात प्रमाणापेक्षा पावसाचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणची संपूर्ण शेती व्यवस्था ही विहिरीवरील पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत या परिसरात झालेल्या कूपनलिकांमुळे या संपूर्ण भागाचे पाणी २५० ते ३५० स्के. फुटापर्यंत खाली गेले आहे. या भागातील वाठार स्टेशन सारख्या गावास कायमस्वरुपी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी संघर्ष करूनही या भागाला अद्याप कोणत्याही प्रकारचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही.
चालू वर्षी मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढली असून, विहिरींमधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. यामुळे देऊर परिसरातील उसाचे पीक आता धोक्यात आले आहे. पिके वाचविण्यासाठी वसनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडले तर या भागची पीक परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. (वार्ताहर)