गरिबांच्या शिक्षणाला बाप्पा पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:44 PM2018-07-08T22:44:33+5:302018-07-08T22:44:45+5:30

Poor education of the poor people | गरिबांच्या शिक्षणाला बाप्पा पावला

गरिबांच्या शिक्षणाला बाप्पा पावला

Next

सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गुणवत्ता असूनही पैशांअभावी पुढील शिक्षण अर्धवट सोडणारी असंख्य गुणी मुले-मुली आपण अवती-भवती पाहतो. आता मात्र, त्यांना पैशांअभावी शिक्षण सोडायचे कारण उरणार नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नवीन उपक्रमानुसार गावागावांतील गणेश मंडळेच या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहेत.
जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे अडीच हजार गणेश मंडळे तात्पुरती नोंदणी करून उत्सव साजरा करतात. आता मात्र तात्पुरती नोंदणी करता येणार नाही. मंडळांना कायमस्वरुपी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी एका दिवसात नोंदणीची सोय करण्यात आली आहे. आॅनलाईन फॉर्म भरून त्यावरच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. हा फॉर्मही मराठीत आहे. त्यामुळे माहिती भरणेही सोपे ठेवण्यात आले आहे. मंडळांनी आपले जमा-खर्चाचे हिशोबही वेळच्यावेळी धर्मादाय आयुक्तांकडे सादर केले तर मंडळांना प्रत्येक वर्षी उत्सवाला परवानगी घ्यायची गरज राहणार नाही. या उपक्रमामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयात मारावे लागणारे खेटेही बंद होणार आहेत.
दरम्यान, गणेशोत्सव म्हटले की सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेतले जात असतात. साहजिकच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीचा आग्रह केला तरी त्याला लोक प्रतिसाद देत असतात. बाप्पांवरील श्रद्धेपोटी अनेकजण मोठ्या रकमेची वर्गणीही देत असतात. या वर्गणीच्या माध्यमातून गरिबांचे शिक्षण पूर्ण झाल्यास एक वेगळा सकारात्मक पायंडा पडणार आहे.
जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांकडून कायमस्वरुपी नोंदणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. १ जूनपासून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंडळांनी आपल्या उत्पन्नातील दहा टक्के रक्कम गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याला निश्चितच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनाही दहावी परीक्षेत ८५ टक्क्यांच्यावर गुण मिळविलेल्या गरीब कुटुंबांतील मुला-मुलींची नावे कळविण्याचे आवाहन धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून केले आहे.
उपक्रमाचा लाभ कोणाला?
याच अनुषंगाने अत्यंत गरीब असलेल्या तसेच पालकांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांनी दहावी, बारावीला ८५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी धर्मादाय कार्यालय, योदोगोपाळ पेठ, चौथा मजला, राजधानी टॉवर्स, सातारा येथे दि. ७ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक धमार्दाय आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले.

Web Title: Poor education of the poor people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.