निकृष्ट दर्जाचे काम; सातारा-पुणे, पंढरपूर महामार्ग कामाची चाैकशी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:48 PM2023-02-27T13:48:27+5:302023-02-27T13:49:03+5:30
दोन-तीन वर्षांतच रस्त्याला भेगा
सातारा : सातारा-पंढरपूर, तसेच सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल चाैकशीची मागणी राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी निवदेनाद्वारे केली होती. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत, कामाची तातडीने चौकशी करून, योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पुणे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना सूचना केली आहे.
याबाबत रमेश उबाळे यांनी माहिती दिली आहे, तसेच निवेदनात म्हटले आहे की, सातारा-पंढरपूर आणि सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून दिले होते. कारण महामार्ग कामात भराव टाकण्यापूर्वी रस्ता मजबुतीसाठी दर्जेदार मुरुम, खडी वापरण्याची गरज असते, परंतु संबंधित ठेकेदाराने चक्क मोठे दगड, तसेच काळी माती वापरल्याने काही ठिकाणी रस्ता खचला आहे. सिमेंट काँक्रिटला भेगा पडल्या आहेत. या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. एकीकडे काँक्रिट रस्ता ४०- ५० वर्षे टिकत असल्याचे सांगण्यात येत असताना, दोन-तीन वर्षांतच रस्त्याला भेगा पडत आहेत.
सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुमारे चार वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची वाटचाल पूर्णत्वाकडे असतानाच, पाहणी केल्यावर काही ठिकाणी रस्ता खचून भेगा पडल्याचे निदर्शनास आले. अधिक माहिती घेतली काँक्रिटच्या खाली टाकण्यात येणाऱ्या भरावासाठी काळी माती वापरल्याचे लक्षात आले. या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गाचे काम प्लॅन व प्रोफाइलनुसार झालेले नाही. रस्त्याच्या कामाच्या भरावामध्ये मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत. खरे तर ७५ एमएमपेक्षा मोठा दगड नियमानुसार भरावासाठी चालत नाही. ठेकेदाराने कटिंग केलेले मटेरियल रस्त्याच्या भरावमध्ये वापरले आहे, तसेच या मटेरियलची रॉयल्टीही भरण्यात आलेली नाही.
या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराचा काळ्या यादीत समाविष्ट करावा. यासाठी ३० दिवसांची मुदत असून, प्रशासकीय पातळीवर दखल न घेतल्यास दि. ९ मार्चपासून उपोषण करणार आहे, असा इशाराही उबाळे यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
असे आहेत मुद्दे...
पुलाच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काॅंक्रिट वापरले आहे. काँक्रिट मिक्स डिझाइनमध्ये बदल केले आहेत. पुलाच्या स्लॅबवरती ६५ एमएम जाडीचा थर टाकणे गरजेचे असताना २५ एमएम टाकण्यात आला. रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांच्या पाइपलाइनसाठी ५००-५०० मीटर अंतरावर क्रॉसिंग द्यावे लागत असताना, ठेकेदाराने कुठेही ठेवले नाही. भविष्यात क्रॉसिंगकरिता रस्ता फोडावा लागणार आहे. प्रत्येक पुलाच्या कामाचे दोन्ही बाजूचे भराव खाली दबले असल्याने, प्रवास करताना वाहन आदळून अपघात होतात.