सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढवणाऱ्या योजनांबाबत सकारात्मक - राज्यपाल रमेश बैस 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:12 PM2024-05-25T12:12:12+5:302024-05-25T12:13:22+5:30

उदयनराजेंसमवेत बैठकीत सविस्तर चर्चा

positive about plans to increase tourism in Satara district says Governor Ramesh Bais | सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढवणाऱ्या योजनांबाबत सकारात्मक - राज्यपाल रमेश बैस 

सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढवणाऱ्या योजनांबाबत सकारात्मक - राज्यपाल रमेश बैस 

महाबळेश्वर : महाबळेश्वर मुक्कामी असलेल्या राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी ‘नमामि गंगे’ योजनेच्या धर्तीवर कृष्णा नदीचे सुशोभीकरण व शुद्धीकरण, मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी शिवस्वराज्य सर्किट याेजना यासह राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी नमूद केले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्यासमवेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये उगम पावून, सातारा, सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या कृष्णा नदीचे सुशोभीकरण आणि शुद्धीकरण करण्यासाठी ‘नमामि गंगे’ योजनेच्या धर्तीवर ‘नमामि कृष्णा’ योजना महाराष्ट्र आणि अन्य राज्यांत राबविणे, बौद्ध सर्किट किंवा रामायण सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे, या शिवस्वराज्य सर्किट योजनेमधून, छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास वृद्धिंगत करणे, मराठा साम्राज्याच्या राजगड, रायगड आणि सातारा या तीन राजधान्यांचा सूचिबद्ध आणि समयबद्ध विकास करणे, पानिपत ते तंजावरमधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधणे, जेणेकरून जगभरातून इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देतील आणि पर्यटनालाही अधिक चालना मिळेल, आदी मुद्दे उदयनराजे यांनी मांडले. 

तसेच प्रतापगडसह राज्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासाकरिता स्थापित केलेल्या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीवर, संसद-विधिमंडळ प्रतिनिधींसह, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी राज्याने पावले टाकणे, या प्रमुख विषयांवरही चर्चा झाली. राज्यपाल रमेश बैस यांनी उदयनराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत राज्यशासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे नमूद केले. यावेळी जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, ॲड. विनीत पाटील, प्रीतम कळसकर उपस्थित होते.

Web Title: positive about plans to increase tourism in Satara district says Governor Ramesh Bais

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.